कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालय उद्या व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाचा 12 वा टप्पा करणार सुरू
Posted On:
26 MAR 2025 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18.06.2020 रोजी व्यावसायिक खाणकामांसाठी कोळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्या उपक्रमाला पुढे नेत कोळसा मंत्रालय 27 मार्च 2025 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाचा 12 वा टप्पा सुरु करायला सज्ज आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत कोळसा उत्पादनाला चालना देणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि राष्ट्रासाठी दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील तर केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे हे सन्माननीय पाहुणे असतील.
बाराव्या फेरीत, एकूण 25 कोळसा खाणी लिलावासाठी खुल्या केल्या जातील, ज्यामध्ये सी एम एस पी [कोळसा खाणी (विशेष तरतुदी) कायदा, 2015] अंतर्गत 7 खाणी आणि एमएमडीआर (खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा, 1957) अंतर्गत 18 खाणींचा समावेश आहे. यापैकी 2 लिग्नाइट खाणी आहेत, ज्या विविध प्रकारच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करतात. शिवाय, 13 कोळसा खाणी पूर्णपणे उत्खनन केलेल्या आहेत, तर अंशतः उत्खनन केलेल्या 12 खाणी आहेत, ज्यामुळे तात्काळ आणि भविष्यातील विकासासाठी संधी उपलब्ध होतील.
याव्यतिरिक्त, कोळसा मंत्रालय एमएमडीआर कायद्यांतर्गत, 11 व्या फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात, अंशतः उत्खनन केलेल्या तीन कोळसा खाणी लिलावासाठी खुल्या करत असून त्यामुळे देशांतर्गत कोळसा उत्पादन आणि ऊर्जा सुरक्षिततेला बळकटी देताना गुंतवणुकीच्या महत्वपूर्ण संधी उपलब्ध होतील.
पारदर्शक आणि बाजार चलित कोळसा क्षेत्र अर्थव्यवस्थेला अधिक पाठबळ देण्याच्या उद्देशासह केंद्र सरकारने गुंतवणूकदार आणि उद्योगजगतासाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत. व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव हा एक एक क्रांतिकारी बदल घडवून आणणारा सिद्ध झाला असून स्पर्धा, कार्यक्षमता आणि शाश्वत खाण पद्धतींना प्रोत्साहन देतानाच भारताच्या कोळसा साठ्याची अफाट क्षमता उलगडली आहे.
व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या 12 व्या टप्प्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ऊर्जा आणि औद्योगिक विकासात स्वयंपूर्णतेसाठी भारताची वचनबद्धता आणखी दृढ होईल. हा टप्पा देशभरातील उद्योग, वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना आधार देणाऱ्या मजबूत आणि लवचिक कोळसा क्षेत्राच्या विकासाला आणखी गती देईल.
कोळसा मंत्रालय सुधारणांना चालना देण्याच्या, व्यवसाय सुलभतेत वाढ करण्याच्या आणि कोळसा खाणकामासाठी एक समृद्ध परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या ध्येयावर ठाम आहे. देश विकसित भारताकडे वाटचाल करत असताना, हे उपक्रम देशाचा आर्थिक पाया मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115567)
Visitor Counter : 25