आयुष मंत्रालय
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पातर्फे लेहमध्ये 11,562 फूट उंचीवर विशेष योग सत्राचे आयोजन
Posted On:
26 MAR 2025 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2025
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 ला 100 दिवस उरले आहेत (काऊंटडाऊन). त्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांचा भाग म्हणून लेह येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा (एनआयएसआर), या सोवा-रिग्पाचे जतन, संवर्धन आणि विकासाकरता आयुष मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेने, 25 मार्च रोजी लेह येथे संस्थेच्या कॅम्पसमध्ये योग साधनेवरील विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.

(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा (एनआयएसआर) ने लडाखमधील लेह येथे 11,562 फूट उंचीवर विशेष योग सत्राचे आयोजन केले होते.)
हिमालयाच्या भव्य पार्श्वभूमीवर, 11,562 फूट (3,524 मीटर) उंचीवर, एनआयएसआरचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या टीमने आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने विकसित केलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल (सीवायपी) अनुसार, योग सत्र आयोजित केले होते.

(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा, एनआयएसआरच्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी योग सत्राचे आयोजन केले)
बर्फाच्छादित शिखरे, थंड बोचरी हवा आणि वातावरणात भरून राहिलेल्या निरामय शांततेची अनुभूती यांची पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गरम्य लेहने या कार्यक्रमासाठी परिपूर्ण मंच निर्माण केला. एनआयएसआरच्या संचालिका डॉ. पद्मा गुरमेट म्हणाल्या, 'योग हा केवळ सराव नसून, ती एक जीवनपद्धती आहे, जी शरीर आणि मन दोघांचेही संगोपन करते. आजच्या वेगवान जगात, आंतरिक संतुलन, मानसिक सुस्पष्टता आणि शारीरिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी हे एक प्रभावी साधन म्हणून काम करते. योग साधनेद्वारे, आपण केवळ स्वतःची नव्हे, तर संपूर्ण समाजाची लवचिकता, सामंजस्य आणि सर्वांगीण आरोग्याची जोपासना करतो. लेहच्या या भव्य उंचीवर, आपण या गोष्टीचा पुनरुच्चार करूया की, योग सर्व सीमा ओलांडून निरामयता आणि शांततेच्या शोधात आपल्या सर्वांना एकत्र आणतो."
महाबोधी आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान केंद्र लेहच्या योग प्रशिक्षक त्सेवांग ल्हामो यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्या म्हणाल्या, “शारीरिक आरोग्य, मानसिक सुस्पष्टता आणि भावनिक संतुलन वाढवून योग आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाची भूमिका बजावतो. नियमित सराव लवचिकता वाढवतो, स्नायू मजबूत करतो, तणाव कमी करतो आणि एकूणच स्वास्थ्य सुधारतो. योगसाधना मानसिक शांततेला प्रोत्साहन देते, दैनंदिन जीवनातील आव्हानांचा सामना करताना आंतरिक शांतता आणि एकता राखायला सहाय्य करते."
आंतरराष्ट्रीय योग दिन - 2025 च्या 100 दिवसांच्या काऊंटडाऊनचे उद्घाटन आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित 'योग महोत्सव- 2025' दरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान आयुष मंत्र्यांनी माहिती दिली होती की, या जागतिक उपक्रमाच्या अकराव्या वर्षाचे औचित्य साधून, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित उपक्रम, पुढील 10 आगळ्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करतील:
- योग संगम: 10,000 ठिकाणी एकत्रित योग प्रात्यक्षिके आयोजित करून जागतिक विक्रम नोंदवणे.
- योगबंधन: ऐतिहासिक स्थळांवर योग सत्रे आयोजित करण्यासाठी 10 देशांबरोबर जागतिक भागीदारी.
- योग पार्क: दीर्घकालीन सामुदायिक सहभागासाठी एक हजार योग पार्क विकसित करणे.
- योग समावेश: दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक, बालके आणि वंचित गटांसाठी योग साधनेवरील विशेष कार्यक्रम.
- योग प्रभाव: योग साधनेच्या सार्वजनिक आरोग्यावरील गेल्या दशकभरातील प्रभावाचे मूल्यांकन.
- योग कनेक्ट: ख्यातनाम योग साधना तज्ञ आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांचा समावेश असलेली आभासी योग परिषद.
- हरित योग: वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेबरोबर योगाभ्यासाची सांगड घालणारा शाश्वततेवर आधारित उपक्रम.
- योग अनप्लग्ड: तरुणांना योग साधनेकडे आकर्षित करणारा कार्यक्रम.
- योग महाकुंभ: आठवडाभर 10 ठिकाणी चालणारा उत्सव, ज्याची सांगता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आयोजित मध्यवर्ती उत्सवामध्ये होईल.
- संयोगम्: सर्वांगीण आरोग्यासाठी योग साधनेला आधुनिक आरोग्यसेवेशी जोडणारा 100 दिवसांचा उपक्रम.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115564)
Visitor Counter : 26