कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
डीबीआयएम आराखडा सरकारच्या ‘किमान सरकार, कमाल शासन’ या संकल्पनेला मजबूत करतो : केंद्रीय मंत्री जयंत चौधरी
एमएसडीई तर्फे डीबीआयएम-अनुरुप संकेतस्थळाची सुरुवात
Posted On:
25 MAR 2025 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
भारताच्या डिजिटल शासनविषयक परिसंस्थेला बळकट करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (एमएसडीई) आज डीबीआयएम-अनुरुप संकेतस्थळाची सुरुवात केली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमईआयटीवाय) डिजिटल ब्रँड निश्चिती मॅन्युअल (डीबीआयएम) आवृत्ती 3.0 ला अनुसरुन हे संकेतस्थळ विकसित केले आहे.

या सुधारित संकेतस्थळाची सुरुवात करुन देताना केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी म्हणाले, "एकीकृत आणि नागरिक-केंद्री डिजिटल परिसंस्थेची उभारणी करून डीबीआयएम आराखडा सरकारच्या ‘किमान सरकार, कमाल शासन’ या संकल्पनेला मजबूत करतो. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असताना, एक प्रमाणित तसेच सुरळीत सेवा वितरण प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरते. डीबीआयएम 3.0 ला अनुरुप असलेले आमच्या मंत्रालयाचे संकेतस्थळ प्रत्येक नागरिकासाठी कौशल्यविकासाच्या संधी अधिक सुलभतेने उपलब्ध, समावेशक आणि कार्यक्षम असतील याची सुनिश्चिती करते.” हा उपक्रम साकार करण्यासाठी प्रयत्न करणारे एमएसडीईचे माहिती तंत्रज्ञान पथक आणि एनआयसी यांचे चौधरी यांनी अभिनंदन केले. सर्व भागधारकांनी या संकेतस्थळाचा वापर करावा आणि कौशल्यविकासाशी संबंधित उपक्रम आणि स्त्रोतांची माहिती सुलभतेने प्राप्त होण्याच्या उद्देशाने या संकेस्थळावर सुधारण्यात आलेल्या वैशिष्ट्यांचा वापर करून पाहावा अशी प्रोत्साहनपर सूचना त्यांनी केली.

नव्याने सुरु करण्यात आलेल्या सदर संकेतस्थळामुळे वापरकर्त्यांसाठी पोहोच, एकसारखेपणा तसेच वापरातील सुलभता वाढली असून यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रेरित शोध, भाषिणीच्या माध्यमातून बहु-भाषिक मदत, व्यक्तीच्या नेतृत्वात वापर तसेच केंद्रीकृत आशय व्यवस्थापन इत्यादी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. तीन क्लिकच्या माध्यमातून सोपा वापर करण्याच्या पद्धतीमुळे हे संकेतस्थळ नागरिकांना आवश्यक सेवा आणि कौशल्यविकास स्त्रोतांपर्यंत सोपेपणाने पोहोचणे सुनिश्चित करते.
एमएसडीई संकेतस्थळ एक-थांबा डिजिटल केंद्र म्हणून उपयुक्त ठरत असून यामध्ये स्किल इंडिया अभियान, पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय), राष्ट्रीय अंतर्वासिता प्रोत्साहन योजना (एनएपीएस) यांसह मंत्रालयाच्या इतर अनेक महत्त्वाच्या योजना तसेच उपक्रम यांची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल. यातील प्रत्येक उपक्रम त्या विषयाशी संबंधित डॅशबोर्ड,पोर्टल्स आणि स्त्रोत यांच्याशी सोप्या पद्धतीने संलग्न असल्यामुळे डाटा, कामगिरीचा आलेख तसेच योजना/उपक्रमांचा प्रभाव सांगणाऱ्या कथा या वास्तव वेळी उपलब्ध होण्याची खात्री मिळते.सदर संकेतस्थळाची एकात्मिक रचना पारदर्शकतेत वाढ करते आणि भागधारक, उद्योग तसेच नागरिकांना कौशल्य विकासाच्या संधींचा शोध घेण्यासाठी, प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि सरकारच्या कार्यक्रमात अधिक कार्यक्षमतेने सहभागी होण्यासाठी सक्षम करते.

एमईआयटीवायतर्फे सुरु करण्यात आलेला डीबीआयएम आराखडा सर्व सरकारी मंत्रालये तसेच मंचांवर सातत्यपूर्ण डिजिटल उपस्थिती सुनिश्चित करुन सुरळीत, एकात्मिक आणि पारदर्शक शासनाच्या दृष्टीकोनाची जोपासना करतो. या नव्या प्रणालीचा स्वीकार करणाऱ्या पहिल्या पाच मंत्रालयांमध्ये एमएसडीईचा समावेश असून, कार्यक्षम सार्वजनिक सेवा वितरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्याप्रती मंत्रालयाची कटिबद्धता यातून दिसून येते.
एमएसडीई संचालित सर्व पोर्टल्सनी लवकरात लवकर डीबीआयएम मापदंडांचा स्वीकार करून स्किल इंडिया अभियानाअंतर्गत सर्व डिजिटल मंचाच्या परिचालनात प्रमाणित शासन व्यवस्थेची सुनिश्चिती करावी असे आवाहन देखील केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी उपस्थितांना केले.
अधिक माहितीसाठी, एमएसडीईच्या नव्या संकेतस्थळाला भेट द्या: www.msde.gov.in
S.Patil/S.chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115096)
Visitor Counter : 26