आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते जागतिक क्षयरोग दिन 2025 शिखर परिषदेचे उद्घाटन
Posted On:
24 MAR 2025 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
"भारताची क्षयरोग निर्मूलन रणनीती ही संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार या दृष्टिकोनावर आधारित आहे,"असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे.जगत प्रकाश नड्डा यांनी आज जागतिक क्षयरोग दिन 2025 निमित्त आयोजित शिखर परिषदेला, या परिषदेचे अध्यक्ष या नात्याने संबोधित केले. "होय!आपण क्षयरोगाचो निर्मुलन करू शकतो : वचनबद्धता दर्शवा,गुंतवणूक करा,साध्य करा" ही या वर्षीच्या जागतिक क्षयरोग दिन शिखर परिषदेची संकल्पना आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आपल्या संबोधनातून क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याप्रती भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
क्षयरोग निर्मूलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे 100 दिवसांची जोरकस मोहीम राबवण्याच्या धोरणाची त्यांनी प्रशंसाही केली. या मोहीमेअंतर्गत केवळ हातानेच चालवता येणारी क्ष-किरण उपकरणे आणि न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन चाचण्यांचा (एनएएटी) अंतर्भाव केला गेला आहे. या सुविधा काही मोबाइल व्हॅन अर्थात फिरत्या वाहनांच्या आधारे प्रत्यक्षात अमलात आणल्या गेल्या आहेत. या फिरत्या वाहनांमुळे भौगोलिक अडथळ्यांवर मात करत ही मोहीम राबवणे शक्य झाले असून, त्यामुळे दुर्गम आणि दुर्लक्षित भागांमध्ये आवश्यक तपासणी आणि निदान सेवा उपलब्ध करून देणेही शक्य झाले आहे. ही मोहीम राबवल्या जात असलेल्या जिल्ह्यांमध्ये 13.46 लाखांपेक्षा जास्त निक्षय शिबीरे अथवा समुदाय तपासणी तसेच जनजागृती शिबिरे आयोजित केल्याची माहितीही नड्डा यांनी यावेळी दिली. या उपक्रमांमुळे क्षयरोग विषयक आवश्यक सेवा थेट करोडो लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहितीही नड्डा यांनी दिली.

सद्यस्थितीत भारतात क्षयरोग विषयक उपचारांची व्याप्ती 59% वरून 85% पर्यंत वाढली असल्याची बाबही नड्डा यांनी यावेळी नमूद केली. देशभरात 12.97 कोटी लोकांची क्षयरोग विषयक तपासणी करण्यात आली आहे, या तपासण्यांमध्ये 7.19 लाख नवे रुग्ण आढळल्याची माहिती त्यांनी दिली.शोध घेतलेल्या या क्षयरोगग्रस्त रुग्णांपैकी, अंदाजे 2.85 लाख रुग्ण हे लक्षणे नसलेले रुग्ण होते, आणि या मोहिमेअंतर्गत अगदी टप्पेवार आणि नियोजित पद्धतीचे तपासणी धोरण राबवले गेले नसते तर कदाचित हे रुग्ण आढळून आले नसते ही बाबही नड्डा यांनी नमूद केली.देशभरातील 5,000 पेक्षा जास्त आमदार आणि 10,000 ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभाग नोंदवल्याचे नड्डा यांनी सांगितले.
या यशस्वी उपक्रमांचा उल्लेख करताना, त्यांनी संपूर्ण देशभर हे अभियान विस्तारित करण्याच्या मंत्रालयाच्या योजना जाहीर केल्या. "क्षयरोग अजून संपलेला नाही," असे सांगून त्यांनी क्षयरोग निर्मूलन अभियानाचा विस्तार करून ते भारतातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय जाहीर केला.
नड्डा यांनी सांगितले की, भारत क्षयरोग संशोधनासाठी आघाडीच्या जागतिक वित्तपुरवठादारांपैकी एक आहे आणि त्यांनी क्षयरोगावरील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी आयसीएमआरचे अभिनंदन केले. त्यांनी काही नवोन्मेषांचा उल्लेख केला,जसे की कोविड महामारीदरम्यान वापरण्यात आलेल्या आरटी-पीसीआर यंत्रांचा क्षयरोग तपासणीसाठी केलेला उपयोग. त्याचप्रमाणे, आयसीएमआरद्वारे विकसित केलेल्या स्वदेशी निदान संचांमुळे केवळ तपासणी खर्च कमी होत नाही तर एकाच वेळी 32 चाचण्या करून कार्यक्षमतेतही वाढ होते.
आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी लोकप्रतिनिधी, समाजातील नेते, खासदार, आमदार, ग्रामप्रमुख आणि स्थानिक नेत्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या नेत्यांच्या योगदानामुळे समाजात जागरूकता निर्माण करण्यात आणि समुदायांना या आजाराविरोधात एकत्र आणण्यात मोठी मदत झाली,असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी "क्षयरोग मुक्त भारत अभियान" यावर आधारित डिजिटल कॉफी टेबलबुकचे अनावरण करण्यात आले.या पुस्तकात अभियानाच्या अंमलबजावणीचे प्रत्यक्ष दृश्ये आणि थेट कार्यक्षेत्रामधील छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत.
यावेळी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 100 दिवसांच्या तीव्र क्षयरोग मुक्त भारत अभियानातील उल्लेखनीय कामगिरीसाठी तसेच "क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत" उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
S.Kakade/T.Pawar/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114632)
Visitor Counter : 36