विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
क्षयरोग संशोधनात भारताने गाठला महत्त्वाचा टप्पा: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलॉसिसच्या 10,000 जनुकीय अनुक्रमांचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केली
Posted On:
24 MAR 2025 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात मिळवलेल्या लक्षणीय यशाचा उल्लेख करत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ,जितेंद्र सिंह यांनी आजच्या “जागतिक क्षयरोग दिना”निमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित परिषदेत महत्त्वाची घोषणा केली. भारतात क्षयरोग रुग्णांकडून घेण्यात आलेल्या “मायकोबॅक्टेरीयम टयूबरक्युलॉसिस” या जिवाणूच्या 10,000 विलगीकृत नमुन्यांच्या जनुकीय अनुक्रमांचे काम पूर्ण झाले आहे असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर क्षयरोग निर्मूलनाप्रती भारताच्या कटिबद्धतेने या कामगिरीमुळे मोठी उंची गाठलेली आहे.

आघाडीचे वैद्यकीय शिक्षकगण, आरोग्य क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी डब्ल्यूएचओच्या जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्षे अलीकडेच क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकार करत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांवर अधिक भर दिला. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहयोगात्मक संशोधन आणि संपूर्ण विज्ञान, संपूर्ण सरकार आणि संपूर्ण अभियान पातळीवरील दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
जनुकीय अनुक्रम लावण्याचा उपक्रम क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी माहितीचा आधार घेऊन संशोधन करण्यावर केंद्रित असलेल्या आणि 24 मार्च 2022 रोजी सुरु झालेल्या डेअर2इरॅडी टीबी म्हणजेच क्षयरोग उच्चाटनासाठी माहितीवर आधारित संशोधन कार्यक्रमाचा भाग आहे. केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभाग(डीबीटी), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख वैद्यकीय संस्थांच्या सहकार्यासह राबवण्यात येणारा भारतीय क्षयरोग जनुकीय सर्वेक्षण (आयएनटीजीएस) संघ हा या उपक्रमाचा महत्वाचा घटक आहे. औषध प्रतिरोधाची म्हणजेच क्षयरोगावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम न होण्यासाठी कारणीभूत उत्परिवर्तने निश्चित करण्यासाठी तसेच क्षयरोग उपचाराचे अधिक उत्तम परिणाम साध्य करण्यासाठी क्षयरोग रुग्णांचे 31,000 विलगीकृत नमुन्यांचे जनुकीय अनुक्रम निश्चित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की सध्या विकसित करण्यात असलेल्या गहन जनुकीय माहितीसंचात क्षयरोग निदान आणि औषध प्रतिरोधाचा अंदाज या दोन्हींमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.जनुकीय अनुक्रम प्राप्त झाल्यामुळे निदानाची अचूकता सुधारेल आणि प्रतिरोधाचे स्वरूप लवकर स्पष्ट होऊन, परिणामकारक औषध योजना निश्चित करण्यासाठी आवश्यक कालावधी काही आठवड्यांवरुन केवळ काही तास अथवा दिवस इतका कमी होईल. यातून प्रत्येक क्षयरोग रुग्णाच्या गरजेनुसार उपचार पद्धतीची रचना करण्यात मदत होईल आणि उपचार अयशस्वी होण्याचा किंवा पुन्हा क्षयरोग होण्याचा धोका कमी होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114630)
Visitor Counter : 35