अर्थ मंत्रालय
भारत येत्या 25 ते 27 मार्च 2025 दरम्यान मुंबईत तीन दिवसीय एफएटीएफ खाजगी क्षेत्र सहयोग मंच 2025 चे यजमानपद भूषवणार
एफएटीएफच्या अध्यक्ष एलिसा डी अँडा माद्राझो यांच्या हस्ते 26 मार्च 2025 रोजी पीएससीएफ 2025 चे औपचारिक उद्घाटन होणार असून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
पीएससीएफ 2025 च्या कार्यक्रमपत्रिकेत देयक पारदर्शकता, वित्तीय समावेशन आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या जागतिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांचा समावेश असेल
Posted On:
24 MAR 2025 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
आर्थिक कृती कार्य दल (एफएटीएफ) खाजगी क्षेत्र सहयोग मंच (पीएससीएफ) 2025 हा उपक्रम येत्या 25 ते 27 मार्च 2025 दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा महसूल विभाग या मंचाचे यजमानपद भूषवत आहे.या कार्यक्रमाच्या आयोजनातून आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याला रोखण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नात भारताच्या जबाबदार नेतृत्वाचे प्रतिबिंब दिसून येते.
एफएटीएफच्या अध्यक्ष एलिसा डी अँडा माद्राझो 26 मार्च 2025 रोजी पीएससीएफ 2025 चे औपचारिक उद्घाटन करतील तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (महसूल) विवेक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील बहु-विद्याशाखीय पथकाचा पीएससीएफच्या भारतीय प्रतिनिधीमंडळात समावेश आहे.

मनी- लाँड्रिंग विरोध आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यातील भारताचे नेतृत्व
एफएटीएफच्या उपक्रमांमधील भारताच्या सहभागाला व्यापक प्रमाणावर मान्यता मिळाली आहे.भारत एफएटीएफच्या सुकाणू गटाचा सदस्य असून जोखीम, कल आणि पद्धती यावरील कार्यगटाचा सह-अध्यक्ष देखील आहे. भारताने नोव्हेंबर 2024 मध्ये इंदूर येथे आर्थिक गैरव्यवहार अर्थात मनी लाँड्रिंग आणि दहशवादी कारवायांना होणारा वित्तपुरवठा यांवर आळा घालण्यासाठी युरेशियन ग्रुप (EAG) ची पूर्ण बैठक आयोजित केली होती. भारताने जून 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या एफएटीएफच्या पूर्ण बैठकीत एफएटीएफ परस्पर मूल्यमापन अहवाल सादर केला तर सप्टेंबर 2024 मध्ये त्याचे प्रकाशन झाले. परस्पर मूल्यमापनामध्ये "नियमित पाठपुरावा" दर्जा प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये स्थान मिळवून भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी सिद्ध केली आहे.
भारताने मनी लाँड्रिंग आणि दहशवादी कारवायांना होणारा वित्तपुरवठा यावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांची या अहवालात प्रशंसा केली असून प्रगत फिनटेक परिसंस्था,यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि आधार-सक्षम डिजिटल ओळख पडताळणी आणि सक्रिय आंतर-संस्था समन्वय यांसारख्या नवोन्मेषांना त्यात अधोरेखित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाची सांगड वित्तीय सुरक्षेशी घालून भारताने जगासमोर एक जागतिक मापदंड स्थापन केला आहे.
पीसीएसएफ 2025
आगामी पीसीएसएफ कार्यक्रम हा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि दहशतवादाला वित्तपुरवठा यांना आळा घालण्यासाठी भारतातर्फे होत असलेल्या प्रयत्नांच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. पीसीएसएफ हा वार्षिक कार्यक्रम एफएटीएफ सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संघटना आणि खासगी क्षेत्रातील भागधारक यांच्यादरम्यान होणाऱ्या चर्चेसाठी महत्त्वाचा मंच उपलब्ध करून देतो. परस्पर सहयोगाची जोपासना, सर्वोत्तम पद्धतींच्या माहितीची देवाणघेवाण आणि नव्याने उदयाला येणाऱ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी, मनी लाँड्रिंग तसेच दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा प्रतिबंध यासाठी एफएटीएफचे मापदंड लागू करण्याला प्रोत्साहन देणे हा या मंचाचा उद्देश आहे.
या वर्षीच्या कार्यक्रमात एफएटीएफच्या जागतिक नेटवर्कमधील देश तसेच वित्तीय संस्था, नियुक्त बिगर-वित्तीय व्यापार आणि व्यवसाय (डीएनएफबीपीज), आभासी मालमत्ता सेवा पुरवठादार (व्हीएएसपीज), विविध आंतरराष्ट्रीय संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
पीसीएसएफ 2025 च्या कार्यक्रमपत्रिकेतून आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकता,वितीय समावेशन तसेच वितीय यंत्रणांच्या डिजिटल परिवर्तनासह जागतिक प्राधान्यक्रमांचे दर्शन घडते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे क्रिप्टो करन्सीशी संबंधित आर्थिक घोटाळ्यांसारख्या नवनव्या आर्थिक गुन्ह्यांचा उगम होत असताना, तंत्रज्ञानाचा वापर करण्यातील तसेच जोखीम-आधारित दृष्टीकोनाची जोपासना करण्यातील भारतीय तज्ज्ञ मंडळी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी काही महत्त्वाचे विचारधन देऊ करतात. या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यातून, भारत एफएटीएफच्या जागतिक मानकांची पूर्तता करण्याप्रती वचनबद्धतेला दुजोरा देत आहे.
येत्या तीन दिवसांत, या मंचावर होणाऱ्या चर्चा जागतिक पातळीवर मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांभोवती गुंफलेल्या असतील. सशक्त, नियामकीय संस्थांच्या जोखीम-आधारित परीक्षणाच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला चालना देत असताना एफएटीएफ नव्याने उदयाला येणाऱ्या धोक्यांचा कशा पद्धतीने सामना करत राहील याविषयी सहभागींना अधिक माहिती मिळवता येईल.
सदर कार्यक्रमात उदयोन्मुख वित्तीय गुन्ह्यांच्या जोखमीचा अधिक चांगल्या पद्धतीने सामना करण्याचे मार्ग निश्चित करण्यासाठी खासगी क्षेत्रात माहिती-सामायीकीकरण पद्धतींचे मूल्यांकन करण्यात येईल. तसेच हा मंच आगामी काळात दहशतवाद्यांना त्यांच्या कारवायांसाठी मिळणारा पैसा आणि त्यातून उद्भवणारे धोके याबाबत विचारमंथन करेल आणि अशा आव्हानांच्या विरोधात जागतिक प्रतिबंध मजबूत करणाऱ्या उपायांच्या शोधावर अधिक भर देईल.
S.Kakade/B.Sontakke/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114568)
Visitor Counter : 35