विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
गेल्या दहा वर्षांमध्ये भारताच्या जैव-अर्थव्यवस्थेने वर्ष 2014 मधील 10 अब्ज डॉलर्स मूल्याच्या उल्लेखनीय अशी 16 पट वाढ दर्शवत वर्ष 2024 मध्ये 165.7 अब्ज डॉलर्सपर्यंत झेप घेतली आहे: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
21 MAR 2025 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2025
गेल्या दहा वर्षांमध्ये भारताच्या जैव-अर्थव्यवस्थेने वर्ष 2014 मधील 10 अब्ज डॉलर्स मूल्यामध्ये उल्लेखनीय अशी 16 पट वाढ दर्शवत वर्ष 2024 मध्ये 165.7 अब्ज डॉलर्सपर्यंत झेप घेतली आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात बीआयआरएसी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात “भारताचा जैव अर्थव्यवस्था अहवाल 2025” (आयबीईआर 2025) जारी करताना ते आज बोलत होते.
ही अभूतपूर्व वाढ म्हणजे भारताच्या भविष्यकालीन आर्थिक विकासाचा महत्त्वाचा स्तंभ म्हणून जैवतंत्रज्ञानाची जोपासना करण्याप्रती सरकारच्या बांधिलकीचा पुरावाच आहे यावर त्यांनी भर दिला.

“फक्त 10 वर्षांत भारताची जैव-अर्थव्यवस्था 10 अब्ज डॉलर्सपासून 165.7 अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारली,” आयबीईआर 2025 चा दाखला देत डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले. देशाच्या जैवअर्थव्यवस्था क्षेत्राने केलेल्या प्रगतीवर या अहवालात भर देण्यात आला असून यातील माहितीनुसार, जैवअर्थव्यवस्था क्षेत्र देशाच्या एकंदर जीडीपीमध्ये 4.25% चे योगदान देत आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट अप उद्योगांची जोपासना करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या बायोसारथी या अग्रणी जागतिक मार्गदर्शक उपक्रमाची देखील सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले की हा उपक्रम नवोन्मेषाची वाढ करणे, उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील सहयोग सुधारणे आणि जागतिक पातळीवर यश मिळवण्यासाठी भारतीय स्टार्ट अप उद्योगांचे स्थान बळकट करणे यांच्या माध्यमातून भारताची जैवतंत्रज्ञान परिसंस्था बळकट करेल. हा उपक्रम परदेशातील तज्ञांना, विशेषतः समाज ऋणातून उतराई होण्यासाठी स्वेच्छेने तयार असणाऱ्या भारतीय समुदायातील तज्ञांना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांच्या भूमिकेतून सहभागी करून घेईल.

या परिवर्तनाला चालना देणाऱ्या मोदी सरकारच्या धोरणांची भूमिका केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केली. अलीकडेच मंजूर झालेल्या आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष तसेच उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘बायो-ई3 म्हणजेच अर्थव्यवस्था, रोजगार आणि पर्यावरण यांसाठी जैवतंत्रज्ञान’ या धोरणाबाबत त्यांनी ठळकपणे माहिती दिली.
अभिनवतेला मोठी चालना देत, भारताच्या जैवतंत्रज्ञानसंबंधी स्टार्ट अप परिसंस्था मोठ्या प्रमाणात विकसित झाली असून एका दशकापूर्वी केवळ 50 स्टार्ट अप उद्योगांचे अस्तित्व असलेल्या या परिसंस्थेत आज 10,075 स्टार्ट अप कार्यरत आहेत. या दहापट वाढीची प्रशंसा करत केंद्रीय मंत्र्यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि धोरण-प्रेरित दृष्टीकोनाला यासाठीच्या सक्षम वातावरणनिर्मितीचे श्रेय दिले.

गेल्या दशकभरात संशोधन आणि विकासविषयक कार्यांसाठीचा भारताचा सकल व्यय (जीईआरडी) दुपटीहून अधिक वाढला आहे याकडे निर्देश करत केंद्रीय मंत्री म्हणाले की निधी वितरणातील ही मोठी वाढ वैज्ञानिक संशोधन आणि नवनिर्मिती यांना चालना देण्याचा सरकारचा निर्धार अधोरेखित करते.
“आपण जैव-क्रांतीची पहाट झालेली पाहत आहोत आणि जशी माहिती तंत्रज्ञानातील क्रांती पश्चिमेकडील देशांसाठी परिवर्तनकारी ठरली तशीच ही जैव-क्रांती भारतात परिवर्तन घडवून आणणारी ठरेल. सातत्यपूर्ण प्रयत्नांसह भारत जागतिक जैवतंत्रज्ञान क्रांतीत केवळ सहभागी झालेला नाही – आपण त्याचे नेतृत्व करत आहोत,” असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी ठाम प्रतिपादन केले.

* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113905)
Visitor Counter : 35