ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक संस्थेद्वारा (Bureau of Indian Standards-BIS) 2025-26 या वर्षासाठीचा वार्षिक मानकीकरण कार्यक्रम (Annual Programme for Standardisation-APS) जाहीर
Posted On:
21 MAR 2025 1:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2025
देशाची राष्ट्रीय मानक संस्था असलेली भारतीय मानक संस्था (Bureau of Indian Standards - BIS), 2025-26 या वर्षासाठीचा वार्षिक मानकीकरण कार्यक्रम (Annual Programme for Standardisation - APS) जाहीर करणार आहे. यासंदर्भात भारतीय मानक संस्थेने 5 मार्च ते 11 मार्च 2025 विविध भागधारकांसोबत सल्लामसलत सत्रांचं आयोजन केलं होतं, यात 40 मंत्रालये तसंच 84 उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या सर्व भागधारकांनी आपल्या तपशीलवार सादरीकरणाच्या माध्यमातून संस्थेला महत्वाच्या सूचना आणि शिफारसी सादर केल्या होत्या. याआधारेच हा वार्षिक मानकीकरण कार्यक्रम तयार केला गेला आहे. या वार्षिक मानकीकरण कार्यक्रम 2025-26 मध्ये आगामी वर्षात विकसित करायची नवी मानके तसेच सुधारणा करण्याची विद्यमान मानके अशा दोन्हींचा समावेश असणार आहे. याचबरोबरीने भारतीय मानक संस्थेने एक डिजिटल इंटरफेस सुरू केला असून, या माध्यमातून भागधारकांना आपले प्रस्ताव अपलोड अर्थात सादर करता येतील, तसेच त्यांना या प्रस्तावांच्या प्रगतीचा मागोवा देखील घेता येणार आहे. संस्थेचा हा प्रयत्न भारतीय मानक संस्थेने विकसित केलेल्या 23,000 पेक्षा अधिक मानकांचा स्वीकृती दर वाढवण्यासाठी केल्या जात असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अनुसरूनच असल्याचे संस्थेने म्हटले आहे. यामुळे विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर स्विकारार्ह असलेली गुणवत्ता सुनिश्चित करता येईल असेही संस्थेने म्हटले आहे.

वार्षिक मानकीकरण कार्यक्रमाच्या आखणीसाठी संस्थेने अलिकडेच आयोजित केलेल्या सल्लामसलत सत्रांना भारतीय मानक संस्थेचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मंत्रालये आणि उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींना प्रस्तावित मानके विकासित करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे योगदान देण्याचे तसेच ज्या ज्या वेळी गरज असेल त्या त्यावेळी संबंधित तज्ञांच्या नियुक्तीसाठी नावे सुचवण्याचे आवाहन केले होते. 2025-26 या वर्षासाठीचा वार्षिक मानकीकरण कार्यक्रमामुळे (APS) निर्धारीत लक्ष्यावर भर असलेला धोरणात्मक दृष्टिकोन बाळगत गरजेवर आधारित मानके विकसित करण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि यामुळे विशेष महत्त्वाच्या मुद्यांना प्राधान्य दिले जाण्याची बाबही सुनिश्चित होईल, त्याचबरोबरीने या मानकांच्या स्वीकृतीची व्याप्ती वाढण्याला आणि सुरळीत अंमलबजावणीलाही चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलं.
भारतीय मानक संस्था मानकांमधील दरी निश्चित करण्याच्या तसेच राष्ट्रीय मानके विकसित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याच्या उद्देशाने मंत्रालये आणि उद्योग संघटनांसोबत मानकीकरण विभागांच्या माध्यमातून परस्पर सहकार्याने काम करते. त्यादृष्टीनेच संस्थेने 2025-26 या वर्षासाठीचा वार्षिक मानकीकरण कार्यक्रम तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या सल्लामसलत सत्रांआधी, भारतीय मानक संस्थेने भारत सरकारच्या विविध योजना आणि मोहिमांशी संबंधित भारतीय मानकांचे सखोल मॅपिंगही केले होते, तसेच 24 ऑगस्ट ते 25 जानेवारी दरम्यान विशिष्ट मुद्यांवर भर असलेल्या गट सभांची मालिकाही आयोजित केली होती.
2025-26 या वर्षासाठीच्या वार्षिक मानकीकरण कार्यक्रमामुळे प्राधान्यक्रमावरची मानके विकसित करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळू शकेल, आणि त्यामुळे उत्पादन तसेच सेवा क्षेत्रात या मानकांच्या व्यापक स्वीकृती आणि निरंतर अंमलबजावणीलाही चालना मिळू शकेल.
* * *
JPS/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113575)
Visitor Counter : 53