अणुऊर्जा विभाग
आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या (आयएईए) महासंचालकांच्या हस्ते अणुउर्जा भागीदारीसाठीच्या जागतिक केंद्रातील एस एन बोस इमारतीचे उद्घाटन
भविष्यकालीन तज्ञांची जोपासना करण्याच्या उद्देशाने आयएईएमध्ये अणु अभियांत्रिकी या विषयावर आधारित सहा महिने कालावधीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात
नव्या जीसीएनईपी सुविधेसह भारताची जागतिक अणु संशोधन क्षेत्रातील भूमिका आणखी मजबूत
Posted On:
18 MAR 2025 7:24PM by PIB Mumbai
मुंबई, 18 मार्च 2025
आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेचे (आयएईए) महासंचालक राफाएल मारियानो ग्रॉस्सी यांनी आज नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवनात अणुउर्जा भागीदारीसाठीच्या जागतिक केंद्रातील एस एन बोस इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी अणु अभियांत्रिकी या विषयावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात देखील करून दिली.

याप्रसंगी बोलताना आयएईएचे महासंचालक ग्रॉस्सी यांनी अणुविज्ञान तसेच क्षमता निर्मिती क्षेत्रांतील जागतिक सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले.केंद्रीय अणुउर्जा विभाग सचिव तसेच अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.अजित कुमार मोहंती यांनी अणुउर्जेच्या वापरातून समाजाचा तसेच आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अणु तंत्रज्ञान प्रगत करण्याप्रती तसेच जागतिक सहकार्याप्रती भारताच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
प्रख्यात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावरून आज उद्घाटन झालेल्या नव्या एस एन बोस इमारतीचे नामकरण करण्यात आले असून ही इमारत अणुविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षण यासाठीचे आधुनिक केंद्र म्हणून कार्य करेल. या इमारतीमध्ये जीसीएनईपीच्या विशेष शाळांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अत्याधुनिक प्रयोगशाळा असतील ज्यांच्यामुळे अणुउर्जा सुरक्षितता, रिॲक्टर तंत्रज्ञान, किरणोत्सर्गविषयक सुरक्षितता, अणुउर्जा सामग्रीचे वैशिष्ट्य वर्णन आणि रेडिओआयसोटोपचे वापर यांच्या संदर्भातील क्षमता वाढणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान सुरु करण्यात आलेला अणु अभियांत्रिकी या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा असून रिॲक्टर भौतिकी, अणु इंधन चक्र, रेडिओलॉजिकल सुरक्षितता, अणुउर्जा संरक्षण, आणि अणु तंत्रज्ञानाचे नव्याने उदयाला येणारे उपयोग यांच्याविषयी सखोल ज्ञान पुरवण्याच्या हेतूने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम जागतिक पातळीवरील सर्व जीसीएनईपीधारकांसाठी खुला करण्याचे नियोजन असून एका वर्गात 40 आंतरराष्ट्रीय आणि 10 राष्ट्रीय सहभागींना प्रवेश मिळेल. अणुउर्जेचा निर्धोक, सुरक्षित आणि शाश्वत वापर करण्याप्रती योगदान देण्यासाठी सज्ज असलेली, अणुउर्जा क्षेत्रातील व्यावसायिकांची नवी पिढी जोपासणे या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.

प्रगत रिॲक्टर तंत्रज्ञाने, कार्यबळ विकास, शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच जनतेपर्यंत पोहोच यांवर अधिक भर देत जीसीएनईपी सदस्य देशांनी जागतिक अणुउर्जाविषयक सहयोगाप्रती वचनबद्धतेला दुजोरा दिला. यावेळी तज्ञांनी केलेल्या चर्चेत आंतरराष्ट्रीय भागीदारी, अण्वस्त्र प्रसारबंदी आणि द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तारावर अधिक भर दिला.हवामान बदलाचे उपशमन करण्याबरोबरच उर्जा सुरक्षेची सुनिश्चिती करण्यात अणुउर्जेची भूमिका तसेच आरोग्यसुविधा, कर्करोग उपचार, तांत्रिक सहकार्य आणि जागतिक आरोग्यविषयक संशोधन यांच्याप्रती अणुउर्जेचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
जीसीएनईपीच्या भागीदार देशांतील राजनैतिक अधिकारी, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार तसेच केंद्रीय अणुउर्जा विभागातील (डीएई) वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अणुउर्जा भागीदारीसाठीच्या जागतिक केंद्राने अणु संशोधन, नवोन्मेष, आणि क्षमता निर्मिती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील नेता ही भारताची भूमिका अधिक बळकट केली असून त्यायोगे नेट झिरो म्हणजेच शून्य उत्सर्जनाची विस्तृत संकल्पना साध्य करण्यासाठी तसेच जगभरात शाश्वत उर्जा विषयक साधनांच्या वापराला खतपाणी घालण्यासाठी पाठबळ मिळणार आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112477)
Visitor Counter : 38