रसायन आणि खते मंत्रालय
मुंबईत फार्मा-मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन (पीआरआयपी) योजना या विषयावरील उद्योग संवादाचे आयोजन
Posted On:
13 MAR 2025 7:31PM by PIB Mumbai
मुंबई, 13 मार्च 2025
भारत सरकारच्या फार्मास्युटिकल्स (औषध निर्माण) विभागातर्फे 13 मार्च 2025 रोजी मुंबईत फार्मा-मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन (पीआरआयपी) योजना या विषयावरील उद्योग संवादाचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटना आणि संशोधन संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीईआर), उद्योग क्षेत्रातील नेते, एकाच व्यासपीठावर एकत्र आले. उद्योग-शैक्षणिक क्षेत्राचे संबंध मजबूत करणे, संशोधन आणि विकासाला गती देण्यासाठी सहकार्य वाढविणे आणि सरकारी उपक्रमांचा लाभ घेणे, आणि फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेशी उपायांचे व्यावसायिकीकरण करणे, या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
पीआरआयपी योजनेच्या तपशीलांव्यतिरिक्त, या क्षेत्रातील संशोधन नवोपक्रमांना प्रोत्साहन देणारे आणि सक्षम करणारे इतर सरकारी उपक्रम आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) पेटंट मित्र, मेडटेक मित्र आणि इनटेंट कार्यक्रम पेटंट दाखल करण्यासाठी साहाय्य करतात. त्यामुळे नवोपक्रमाची वाटचाल आणि क्लिनिकल चाचण्या सुकर होतात. मुंबईतील सीएसआयआरचा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स भाषांतर कार्यासाठी नावाजला गेला. या कार्यामुळे संशोधन संस्था उद्योगाशी जोडल्या गेल्या.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे (आयपीए) उपाध्यक्ष डॉ. शर्विल पटेल यांनी उद्योग-आधारित नवोन्मेशाचे महत्त्व, नियामक पाठबळाची गरज आणि उदयोन्मुख फार्मास्युटिकल तंत्रज्ञानात वाढीव गुंतवणूकीची गरज अधोरेखित केली, आणि पीआरआयपी योजना आणण्यासाठी भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
संशोधन आणि विकासातील औद्योगिक सहभागाला चालना देण्यासाठी अनुकूल धोरणात्मक वातावरणाच्या आवश्यकतेवर ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्यूसर्स ऑफ इंडिया (ओपीपीआय) चे महासंचालक अनिल मताई यांनी भर दिला.
संशोधनाभिमुख विकास धोरणे आत्मसात करताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसमोरील (एमएसएमई) आव्हाने आणि संधींवर इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयडीएमए) चे राष्ट्रीय अध्यक्ष भरत शाह यांनी प्रकाश टाकला. फार्मा मेडटेकमध्ये संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन (पीआरआयपी) योजनेद्वारे नवोपक्रमाला चालना देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले.
निदान तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व आणि पॉइंट-ऑफ-केअर डायग्नोस्टिक नवोपक्रमांमध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या क्षमतेबद्दल असोसिएशन ऑफ डायग्नोस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स इंडिया (एडीएमआय) चे उपाध्यक्ष वीरल गांधी यांनी माहिती दिली. प्रगत आरोग्यसेवा उपाययोजना क्षेत्रात भारताला भविष्यासाठी सज्ज बनविण्यात या उपक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान असेल, असंही ते म्हणाले.

फार्मास्युटिकल्स विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी, फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय तंत्रज्ञानातील भारताच्या जागतिक नेतृत्वाचे मूलभूत आधारस्तंभ म्हणून भविष्यवेधी उत्पादनांचे महत्त्व आणि परवडण्याजोग्या आरोग्य सेवा उपायांची आवश्यकता, यावर भर दिला.
फार्मा-मेडटेक संशोधन आणि विकासाचे भवितव्य घडवण्यात डेटा-आधारित बाजारपेठेच्या परिवर्तनकारी भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला, आणि अत्यंत वैविध्यपूर्ण जनुक संचय आणि जगातील एक षष्टांश लोकसंख्येचे घर म्हणून भारताचे स्थान लक्षात घेता, वैयक्तीकीकृत आणि अचूक औषधे विकसित करण्यात भारताला असलेल्या अनोख्या तुलनात्मक फायद्यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, पीआरआयपी योजना, देशांतर्गत आणि जागतिक आरोग्य सेवा परिसंस्था मजबूत करू शकेल, अशा नवोन्मेशी, किफायतशीर आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपायांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने, उद्याच्या आरोग्य विषयक आव्हानांसाठी संशोधन आणि नवोन्मेशाची गरज पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

संशोधन आणि नवोन्मेषाच्या संधी, उदयोन्मुख संशोधन आणि विकासाचे कल, उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठीच्या धोरणांबद्दल उद्योग प्रतिनिधींनी आणि इतर भागधारकांनी सखोल अभिप्राय दिला. नियामक मार्गांचे व्यवस्थापन, निधी जमवण्याच्या जास्तीत जास्त संधी निर्माण करणे आणि नाविन्यपूर्ण संशोधन उपक्रमांना चालना देणे याबाबतच्या शिफारसी त्यांनी केल्या.
औषधनिर्माण विभागाच्या वेबसाइटवर असलेल्या सारस्य अभिव्यक्ती (EoI) द्वारे अभिप्राय आणि प्रकल्प तपशील सादर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागधारकांना प्रोत्साहित करण्यात आले. 7 एप्रिल 2025 पर्यंत हे तपशील नोंदवता येणार आहेत. या प्रक्रियेमुळे पीआरआयपी योजनेच्या अंमलबजावणी धोरणात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही योजना उद्योगाच्या गरजांशी सुसंगत राहून क्षेत्रीय वाढीला चालना मिळेल.

मुंबईतील या उद्योग संवादाचा सकारात्मक समारोप झाला. फार्मा-मेडटेक क्षेत्रात सहयोगी आणि नावीन्यपूर्ण परिसंस्था रूजवण्याच्या वचनबद्धतेला सहभागींनी यावेळी दुजोरा दिला.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/Rajshree/Prajna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111299)