संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाचे इम्फाळ हे जहाज मॉरीशसच्या राष्ट्रीय दिन 2025 निमित्त आयोजित सोहोळ्यात सहभागी होणार

प्रविष्टि तिथि: 10 MAR 2025 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2025

भारतीय नौदलाचे इम्फाळ हे जहाज प्रथमच बंदर भेटीसाठी आज, 10 मार्च 2025 रोजी मॉरीशसच्या राजधानीचे शहर असलेल्या पोर्ट लुईस या बंदरात दाखल झाले. मॉरीशसमध्ये दिनांक 12 मार्च 2025 रोजी आयोजित 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात हे जहाज सहभागी होणार आहे. भारतीय लढाऊ जहाजे तसेच विमाने यांनी मॉरीशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होण्याची परंपरा कायम राखत आयएनएस इम्फाळ मॉरीशसमध्ये दाखल झाले आहे. चॅम्प्स द मार्स येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिन संचलनामध्ये  हे जहाज संचलन पथक, नौदल वाद्यवृंद  आणि फ्लायपास्टसाठी हेलिकॉप्टर तैनात करेल. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 10 ते 14 मार्च या कालावधीत पोर्ट लुईस बंदरातील वास्तव्यादरम्यान हे इम्फाळ जहाज परस्पर प्रशिक्षण भेटी, मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धा आणि समुदाय संपर्क  उपक्रमांसह विविध प्रशिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणसंबंधी कार्यक्रमांमध्ये सहभागी होईल. भारत आणि मॉरीशस यांच्यातील द्विपक्षीय बंध आणि सागरी सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भेटीदरम्यान एमसीजीएस म्हणजेच मॉरीशस तटरक्षक जहाजांसह एक संयुक्त वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक विभाग (ईईझेड) टेहळणी आणि सराव कार्यक्रमाचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

या नियोजित संवाद कार्यक्रमात भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’ धोरण तसेच सागर संकल्पना (प्रदेशातील प्रत्येकासाठी सुरक्षा आणि वृद्धी) यांच्यावर दृढतेने भर देण्यात आला आहे. बरोबर एका दशकापूर्वी 12 मार्च 20१5 रोजी एमसीजीएस बाराकुडा हे मॉरीशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलाच्या सेवेत समाविष्ट होणाऱ्या पहिल्या भारतीय बनावटीच्या लढाऊ जहाजाच्या कार्यान्वयन प्रसंगी आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर धोरण आणि संकल्पनेवर अधिक भर दिला होता. मॉरीशस राष्ट्रीय दिन सोहळ्यात अत्याधुनिक भारतीय लढाऊ जहाज तसेच विमान यांच्या तैनातीतून बेट प्रकारातील देश, विशेषतः मॉरीशससारख्या देशांशी भागीदारीसह निर्धोक, सुरक्षित आणि स्थिर हिंदी महासागर प्रदेशाला (आयओआर)प्रोत्साहन देण्याप्रती भारताची कटिबद्धता देखील अधोरेखित होते.भारत देश मॉरीशसशी दृढ ऐतिहासिक, राजकीय आणि आर्थिक, सुरक्षाविषयक आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंध सामायिक करतो.

डिसेंबर 2023 मध्ये नौदलाच्या सेवेत कार्यान्वित झालेले इम्फाळ हे जहाज प्रकल्प 15बी (विशाखापट्टणम श्रेणी ) मधील चार स्वदेशी विनाशिकांपैकी तिसरे जहाज आहे. अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि यंत्रसामग्री यांनी सुसज्ज या जहाजाची गणना जगातील सर्वात मोठ्या आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक प्रगत जहाजांमध्ये केली जाते.  

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2110042) आगंतुक पटल : 122
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali