इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पहिल्या इलेक्ट्रॉनिक टॉय हॅकेथॉन (ई-टॉयकॅथॉन 2025) च्या विजेत्याची केली घोषणा : स्वदेशी खेळणी उद्योग परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल

Posted On: 09 MAR 2025 6:47PM by PIB Mumbai

 

इलेक्ट्रॉनिक खेळणी क्षेत्राला चालना देण्यासाठी, भारतात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संशोधन उपक्रमांतर्गत सी-डॅकने "ई-टॉयकॅथॉन 2025" चे आयोजन केले होते. सीडीएसी-नोएडा येथे ई-टॉयकॅथॉन 2025 यशस्वीरित्या संपन्न झाली. तरुण संशोधकांना आणि नवोन्मेषकांना स्वदेशी, शाश्वत उपाय विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून खेळणी क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणे हा टॉयकेथॉन’चा उद्देश होता.

e-Toycathon 2025 Pix 1.jpeg

हा पुरस्कार सोहळा 8 मार्च 2025 रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन, अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास गट समन्वयक सुनीता वर्मा, सी-डॅक-नोएडा येथील कार्यकारी संचालक विवेक खनेजा, मेकाशी टॉयजचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन, डॉ. मॅडीज इनोव्हेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिर्बान गुप्ता तसेच सरकारी आणि खेळणी उद्योगातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

स्पर्धेत प्रदर्शित केलेल्या 2-3 प्रोटोटाइपचे व्यावसायिक उत्पादन केले जाईल, असे डॉ. मॅडीज इनोव्हेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिर्बान गुप्ता यांनी जाहीर केले .

e-Toycathon 2025 Pix 2.jpeg

कोइम्बतूर येथील श्री कृष्णा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेला प्ले मॅट टॉयसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले. हे खेळणे एक मजेदार आणि आकर्षक प्ले मॅट आहे ज्यामध्ये पियानोच्या फंक्शनल की, प्राण्यांचे चित्र आणि ध्वनी/ड्रम/संगीत/ताल  इत्यादींचा समावेश आहे.

खेळण्यातील ही मॅट  मुलायम सामग्रीपासून बनवली असल्याने तिची घडी घालता येते. मुले पिआनो वाजवणे आणि नृत्य या दोन्हींमध्ये गुंतून जाऊ शकतात; यामध्ये मनोरंजनासाठी संगीताचा आनंद घेता येईल तसेच संगीताविषयीचे ज्ञान आणि दृश्य प्रशिक्षण यात  सुधारणा होते.

दुसरे पारितोषक नोएडाच्या जेपी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला रोबो- मेन्टॉर एआय ला प्रदान करण्यात आले. हा एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक खेळ आहे, जे रोबोटिक्सच्या उत्साहाला जनरेटीव्ह एआयच्या साहाय्यक क्षमतांशी जोडून घेत मुलांना सक्षम कऱण्यासाठी तयार केले आहे. याचा प्राथमिक उद्देश , मुले त्यांचा रोबोट तयार करतील आणि प्रोग्राम करण्याचा शिक्षणानुभव घेतील तसेच त्यांच्यामध्ये प्रतिनिधित्वाची आणि यशाची भावना जागृत करणारी गतिमान वैयक्तीक मार्गदर्शन मिळेल.

दुर्गापूरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने परस्पर संवादक्षम शैक्षणिक तक्त्यासाठी तिसरे पारितोषिक पटकावले. या तक्त्यात विविध उपक्रमांमधून भारताविषयी जाणून घेण्यात मुलांना सहभागी करण्याच्या दृष्टीने तयार केला आहे. हा तक्ता इंग्रजी भाषेत असून त्यामध्ये प्रादेशिक भाषा निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. तक्ता परस्परसंवादी प्रकारातला असून मुले विशिष्ट चित्रावर बोटाने दाबू शकतात आणि आवाज, प्रकाशाच्या माध्यमातून त्यांना प्रतिसाद मिळतो.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, श्रीनगर, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, सेनापती, मणिपूर यांना अनुक्रमे कॉम्पॅक्ट मिनी ड्रोन टॉय आणि इलेक्ट्रॉनिक कॅशीयर मशीन यांच्यासाठी उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात आले.

***

S.Kane/S.Mukhedkar/VSS/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2109709) Visitor Counter : 32


Read this release in: English , Urdu , Hindi