महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

न्यूयॉर्क येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या युएनसीएसडब्ल्यु च्या 69 व्या सत्रात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी सहभागी होणार


भारत सरकारने महिला आणि मुलींच्या समग्र विकासासाठी  हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत महिला आणि बालविकास मंत्री UNCSW येथे राष्ट्रीय निवेदन सादर करतील.

मंत्री भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील

Posted On: 09 MAR 2025 9:10AM by PIB Mumbai

 

न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 10 मार्च 2025 पासून सुरू होणाऱ्या महिलांच्या सद्यस्थितीवरील आयोगाच्या 69 व्या सत्रात केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे एक प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री आयोगाच्या या सत्रात  राष्ट्रीय निवेदन देतील आणि मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होतील, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील भारत सरकारच्या सर्व महिला आणि मुलींच्या समग्र विकास आणि सक्षमीकरणासाठीच्या पथदर्शी आणि परिवर्तनकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला जाईल, ज्यात आरोग्य आणि कल्याण, शिक्षण आणि उद्योजकता, डिजिटल आणि आर्थिक समावेशन, महिला नेतृत्व आणि निर्णय क्षमतेस प्रोत्साहन देणे आणि विविध उपक्रमांद्वारे कष्ट कमी करणे यांचा समावेश आहे. महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यातही त्या सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये संसाधने उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता आणि बीजिंग घोषणापत्र तसेच कृती मंचाच्या अंमलबजावणीला गती देणे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात योगदान देणे यांचा समावेश आहे.

CSW अर्थात महिलांच्या सद्यस्थितीबाबत आयोग ही महिलांच्या लिंगभाव समानता, हक्क आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित असलेली प्रमुख जागतिक आंतरशासकीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) कार्यात्मक आयोगाच्या पुढील सत्राचे आयोजन 10 ते 21 मार्च 2025 दरम्यान केले जाणार आहे. वर्ष 1995 मध्ये चौथ्या जागतिक महिला परिषदेत स्विकारण्यात आलेल्या बीजिंग घोषणापत्र आणि कृती व्यासपीठाच्या महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणावरील ऐतिहासिक जागतिक मार्गदर्शक साधनाच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त 2025 हे वर्ष साजरे होत असल्याने या वर्षीचे सत्र महत्त्वपूर्ण आहे.

या सत्रात त्याच्या अंमलबजावणीचा आढावा आणि मूल्यांकन, जागतिक प्रगती आणि लिंग समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या साध्यतेवरील आव्हानांचे विश्लेषण आणि शाश्वत विकासासाठी 2030 च्या विषयपत्रिकेची संपूर्ण अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र महिला मुख्यालयाच्या सहकार्याने "डिजिटल आणि आर्थिक समावेशनावर मंत्रीस्तरीय गोलमेज - महिला सक्षमीकरण आणि नेतृत्वासाठी एक उत्प्रेरक: ग्लोबल साऊथचे अनुभव आणि मुख्य संसाधनांबाबत गांभीर्य" या विषयावर 12 मार्च 2025 रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित होणाऱ्या उच्चस्तरीय कार्यक्रमात केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सत्रात संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश तसेच आंतर-शासकीय संस्था, खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, नागरी समाज, महिला समूह आणि संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल.

या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संदर्भात भारतीय समुदायाशी संवाद साधतील.

***

JPS/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2109588) Visitor Counter : 37


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil