लोकसभा सचिवालय
भारत एका नवीन युगाचा साक्षीदार बनत आहे जिथे महिला प्रत्येक स्तरावर नेतृत्वाची भूमिका स्वीकारत आहेत, प्रत्येक क्षेत्रातील अडथळे पार करत आहेत: लोकसभा अध्यक्ष
Posted On:
08 MAR 2025 8:25PM by PIB Mumbai
लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी संविधान सभेच्या 15 महिला सदस्यांच्या प्रेरणादायी दृष्टीकोनाला भावपूर्ण अभिवादन केले. या महिलांचे योगदान राष्ट्राला उर्जा देत राहील आणि भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करत राहील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. संसद भवनात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की देश भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करत असताना, संविधान सभेच्या 15 महिला सदस्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. या महिलांची दूरदृष्टी आणि समर्पणाने भारताच्या लोकशाहीच्या चौकटीला आकार दिला आणि स्त्री-पुरुष समानतेचा, समावेशक प्रशासन आणि महिला सक्षमीकरणाचा पाया घातला, असेही त्यांनी सांगितले.
स्त्रियांचा आदर करण्याच्या भारताच्या खोल रुजलेल्या परंपरेचा त्यांनी उल्लेख केला. महिलांच्या ठायी असणारे मातृत्व, शक्ती, त्याग आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता हे गुण समाजाची अविभाज्य मूल्ये मानली जातात, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी महिलांनी केलेल्या अतुलनीय सेवेबद्दल आणि आपल्या ‘मातृशक्ती’बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या प्रगतीला आकार देण्यात महिलांच्या परिवर्तन घडवून आणणाऱ्या भूमिकेवर भर देताना बिर्ला यांनी सांगितले की आज महिला केवळ विकासात सहभागी नाहीत तर विकासाचे नेतृत्व करत आहेत - मग ते प्रशासन असो, विज्ञान, संरक्षण, शिक्षण किंवा उद्योजकता असो, या सर्व क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. भारत एका नवीन युगाचा साक्षीदार बनत आहे जिथे महिला लोकशाहीच्या तळागाळापासून सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत प्रत्येक स्तरावर नेतृत्वाची भूमिका घेत आहेत, यांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
महिलांनी विविध क्षेत्रात केलेली उल्लेखनीय प्रगती लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केली. सर्वात आव्हानात्मक आणि सर्वाधिक मेहनत अपेक्षित असलेली कामे देखील आता महिला निर्धाराने आणि उत्कृष्टतेने करत आहेत, असे ते म्हणाले. भारताच्या अंतराळ मोहिमा, संरक्षण, शिक्षण, वैद्यक, क्रीडा इत्यादी क्षेत्रांत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करत महिला शास्त्रज्ञांनी भारताच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या बहुसंख्य प्रतिनिधी महिला असल्याने प्रशासनातील महिलांचे नेतृत्व पूर्वीपेक्षा मजबूत असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या वाढत्या ताकदीचा हा पुरावा आहे, असे ते म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विश्वास व्यक्त केला की एक दिवस असा येईल जेव्हा महिलांना आरक्षणाशिवाय, केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या आणि क्षमतेच्या जोरावर निवडून आलेल्या संस्थांमध्ये बहुसंख्य प्रतिनिधित्व मिळेल. त्यांनी महिला-संचालित विकासासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच, धोरणकर्त्यांनी आणि भागधारकांनी महिला नेतृत्वाखालील उद्योगांना समर्थन आणि प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून त्यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश आणि विस्ताराच्या संधी मिळू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी शंभर टक्के महिला साक्षरता साध्य करण्याच्या अत्यावश्यकतेवरही भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की शिक्षण हे महिलांच्या सशक्तीकरणाचा पाया आहे आणि खऱ्या लैंगिक समानतेसाठी आणि विशेषतः दुर्गम आणि वंचित भागातील समुदायांसाठी शिक्षण व समान संधी मिळणे आवश्यक आहे,
नारी शक्ती वंदना अधिनियम: एक ऐतिहासिक सुधारणा
नारी शक्ती वंदना अधिनियमाचा उल्लेख करताना, बिर्ला यांनी या कायद्याचे भारताच्या लोकशाही व्यवस्थेमधील परिवर्तनकारी पाऊल म्हणून वर्णन केले. नवीन संसद भवनात संमत झालेला हा पहिला कायदा असून, भारताच्या लैंगिक समानतेच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. यामुळे महिला धोरणनिर्मिती आणि निर्णयप्रक्रियेमध्ये अधिक सक्रिय भूमिका बजावतील, असे त्यांनी सांगितले.
2025: महिला आत्मनिर्भरता आणि नेतृत्वासाठी एक मैलाचा दगड
बिर्ला यांनी 2025 हे महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि नेतृत्वासाठी एक ऐतिहासिक वर्ष बनवण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रांनी एकत्र येऊन महिलांसाठी समान संधी, सन्मान आणि प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ साजरा करण्यासाठी नसून, महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पाचा दिवस असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संविधान सभेतील महिला सदस्यांच्या कामगिरीवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन
या प्रसंगी, लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (पीआरआयडीई) आणि राष्ट्रीय महिला आयोग (एनसीडब्ल्यू) यांच्या संयुक्त विद्यमाने संसद भवन संकुलात आयोजित "संविधान सभेतील महिला सदस्य" या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा उत्सव साजरा केला जात आहे. यात संविधान सभेच्या 15 महिला सदस्यांचे योगदान आणि त्यांनी संविधानाच्या निर्मितीत बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा गौरव केला गेला आहे.
उल्लेखनीय उपस्थिती
या कार्यक्रमाला लोकसभा सचिवालयाचे महासचिव उत्पल कुमार सिंग, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, तसेच विविध क्षेत्रांतील धोरणकर्ते, प्रतिष्ठित पाहुणे आणि महिला नेत्या उपस्थित होत्या.
***
S.Tupe/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2109552)
Visitor Counter : 28