संरक्षण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘नाविका सागर परिक्रमा (एनएसपी) – दोन’ या अतिशय आव्हानात्मक सागरी मोहिमेवर असलेल्या चालक दलातील धाडसी महिला अधिकाऱ्यांशी साधला ऑनलाईन संवाद
“जगभर प्रवास करताना प्रचंड आव्हानाला तोंड देत आयएनएसव्ही तारिणीव्दारे केलेले धाडस समस्त नारी शक्तीच्या दृष्टीने दीपस्तंभ”: संरक्षणमंत्री
Posted On:
07 MAR 2025 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2025
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज 7 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दूरदृश्य प्रणालीव्दारे भारतीय नौदलाच्या नाविका सागर परिक्रमा- दोन (एनएसपी- दोन) च्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री राजनाथ सिंह यांनी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांच्याशी संवाद साधला. त्यांची नौका आयएनएसव्ही तारिणी, सध्या दक्षिण अटलांटिक महासागरात फॉकलंड बेटांमधील पूर्वी ज्या बंदराला ‘पोर्ट स्टॅनले असे संबोधित होते, त्या बंदरापासून 450 सागरी मैल अंतरावर आहे, ही नौका आता दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनच्या प्रवासावर आहे.
या संवादा दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी एनएसपी दोन च्या पथकातील सदस्यांमध्ये असलेले धैर्य, समर्पण वृत्ती आणि सततच्या बदलत्या हवामानामध्ये अतिशय लवचिक राहून करीत असलेल्या धाडसी प्रवासाचे कौतुक केले. या नाविक सदस्यांनी आपल्यातील कमालीची सहनशीलता दाखवून, नारी शक्तीचे प्रदर्शन केले आहे. महिलांमध्ये असलेल्या कमालीच्या धैर्याचे प्रदर्शन घडवून आणण्यासाठी भारताकडून सतत प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून जगभर प्रवास करण्याच्या आव्हानात्मक मोहिमेला सुरुवात केली आहे. जगातील सर्वात वेगवेगळ्या समुद्रातील ‘पॉइंट नेमो’ पार करणे आणि सर्वात धोकादायक जलस्रोतांपैकी एक असलेल्या ‘ड्रेक पॅसेज’ मधून प्रवास करणे असे उल्लेखनीय टप्पे पार केल्याबद्दल त्यांनी या नाविक महिला पथकाचे अभिनंदन केले.
सशस्त्र दलामध्ये संरक्षणमंत्र्यांनी सरकारच्या लिंग-समावेशक दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला. यामुळे अधिक तरुणींना संरक्षण आणि साहसी खेळांमध्ये करिअर करण्याची आकांक्षा निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यात महिलांच्या अमूल्य भूमिकेचे कौतुक केले आणि संरक्षण क्षेत्रात महिलांसाठी संधी वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
नाविका सागर परिक्रमा- दोन (एनएसपी -दोन) हा भारतीय नौदलाचा एक प्रमुख उपक्रम आहे. त्याचा उद्देश दोन महिलांच्या पथकाद्वारे जगभर नौकेने प्रवास करणे आहे. एनएसपी- दोन ही मोहीम म्हणजे सागरी आणि संरक्षण क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी , नेतृत्व आणि स्वावलंबनाला चालना देण्यासाठी भारताने केलेल्या संकल्पाचे प्रतीक आहे. भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या पथकाने या प्रतिष्ठित प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ‘नेव्हिगेशन’, हवामान व्यवस्थापन आणि समुद्रामध्ये जगण्याच्या तंत्रांचे कठोर प्रशिक्षण घेतले. या प्रवासाला 2 ऑक्टोबर 2024 रोजी नौदल प्रमुखांनी गोवा येथे हिरवा झेंडा दाखवला होता.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109276)
Visitor Counter : 24