पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 च्या उद्घाटन सत्राला केले संबोधित
Posted On:
05 MAR 2025 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2025
ग्लोबल साउथ हवामान बदल विषयक उद्दिष्टावर काम करत असून जग भारताकडे एक नेता म्हणून पाहत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ते आज जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 च्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते.
“ग्लोबल साऊथ हवामान बदलावरील उद्दिष्टावर काम करत असून, जग आता भारताकडे एक नेता म्हणून पाहत आहे. केवळ 2020 या एका वर्षात भारताने आपल्या जीएचजीम्हणजेच हरित गृह वायू उत्सर्जनात 7.93% कपात केली असून, तो हवामान विषयक कृती प्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचा दाखला आहे,” केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले.
"शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी," या संकल्पनेवरील या परिषदेचे आयोजन, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटने (टेरी) केले होते. गयाना चे पंतप्रधान, ब्रिगेडियर मार्क फिलिप आणि ब्राझीलच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री मरीना सिल्वा यावेळी उपस्थित होत्या.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी हवामान बदला विरोधातील लढाईत ग्लोबल साउथची महत्वाची भूमिका अधोरेखित केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य, महत्त्वाकांक्षा आणि कृतीला चालना देण्याचे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए), आपत्ती प्रतिरोध पायाभूत सुविधांसाठी आघाडी (सीडीआरआय) आणि मिशन लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट (एलआयएफई), यासह विविध परिवर्तनशील जागतिक उपक्रमांचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक शाश्वततेप्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
सर्व प्रकारच्या जीवसृष्टीला सारखेच महत्त्व दिले जाईल आणि पर्यावरण विषयक धोरणे वन्यजीव आणि जैवविविधतेचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करतील, तेव्हाच खरी शाश्वतता प्राप्त होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला.
हवामान बदलावरील जागतिक नेता म्हणून, भारताची भूमिका, हवामान विषयक कृती सर्वसमावेशक, महत्वाकांक्षी आणि सहयोगी राहील, हे सुनिश्चित करणारी असेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. हवामान बदलावरील चर्चेला आकार देण्यासाठी भारतासह ग्लोबल साऊथची उपस्थिती आवश्यक आहे, कारण त्यांना हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे, आणि त्याच बरोबर ते हवामान बदलाच्या समस्येवर शाश्वत विकास पद्धतींमध्ये रुजलेले उपाय देखील सुचवत आहेत, यावर त्यांनी भर दिला. विकसित देशांनी त्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक वचनबद्धतेचे पालन करावे, विशेषत: पॅरिस करारानुसार त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
एनडीसी मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली, जेणेकरून ते हवामान विषयक कृती समोरील आव्हाने आणि संधी या दोन्हींवर उपाय सुचवू शकतील.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी हवामान अनुकूलन वित्त सहकार्य वाढवण्याची तीव्र गरज अधोरेखित केली.
भूपेंद्र यादव यांनी, भारताच्या 2047 साला पर्यंत विकसित भारत बनण्याच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाची रूपरेषा सांगितली, ज्यामध्ये 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट समाविष्ट आहे.




N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108682)
Visitor Counter : 16