कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
ई-मेल फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित नायजेरियन नागरिकाला सीबीआयने केली अटक
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2025 10:01PM by PIB Mumbai
मुंबई, 5 मार्च 2025
केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने ई-मेल फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात अदिया ओकोह या नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. या नायजेरिअन नागरिकाला न्यायालयाने यापूर्वीच गुन्हेगार म्हणून घोषित केलेले आहे. या प्रकरणी सीबीआयने 27 जानेवारी 2012 मध्ये भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 419, 420 सह 511 आणि 120 - B अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 66A (b) आणि (c) अंतर्गत हा गुन्हा नोंदवला होता.
या संदर्भातली तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात केली होती. सीबीआयला प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदाराला 17 जून 2011 रोजी एक फसवणूक करणारा ई-मेल आला होता. या तक्रारदाराच्या ई-मेल आयडीने ऑर्थोडॉक्स चर्च फाउंडेशनच्या सोडतीत 7,50,000 ग्रेट ब्रिटन पाऊंड (GBP) जिंकले असल्याचा खोटा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. जिंकलेली ही रक्कम प्राप्त करण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराकडून वैयक्तिक माहितीची मागणी केली तसेच, त्याला स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्यात 16,700 रुपये जमा करण्यासाठीही प्रवृत्त केले. या प्रकरणातील ऑसिन डॅनियल या एका आरोपीला पोलीसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र अदिया ओकोह याला अटक करण्यात यश आले नव्हते.
या प्रकरणात दि. 13 डिसेंबर 2015 रोजी या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2016 रोजी नवी दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने अडिया ओकोह याला गुन्हेगार म्हणून घोषित केले आणि त्याच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलरही (LOC) जारी करण्यात आले होते. दरम्यान अदिया ओकोह याच्या ठावठिकाणाबद्दल सीबीआयच्या हाती महत्वाची माहिती लागली. त्यानंतर तो भारतातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर त्याला दिल्ली इथे ट्रांझिट रिमांडवर नेले जात असून, त्याला पुढच्या कायदेशीर कार्यवाहीसाठी नवी दिल्लीतल्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर केले जाणार आहे.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2108679)
आगंतुक पटल : 44