युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्रात फिट इंडिया आणि खेलो इंडियाशी संबंधित उपक्रमांबाबत माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद उपक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
04 MAR 2025 9:16PM by PIB Mumbai
मुंबई, 4 मार्च 2025
केंद्र सरकारच्या फिट इंडिया आणि खेलो इंडिया या कार्यक्रमांतर्गत सध्या सुरू असलेल्या तसेच नियोजन उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईच्या (SAI) मुंबई प्रादेशिक केंद्राच्या वतीने आज माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरणाच्या वतीने क्रीडा पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी, खेळाडूंच्या जडणघडणीला चालना देण्यासाठी तसेच नागरिकांना आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली गेली.

साईच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे संचालक, पांडुरंग चाटे यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी भारताच्या क्रिडा क्षेत्राच्या भवितब्याबद्दल प्राधिकरणाच्या दृष्टीकोनाविषयी संवाद साधला. क्रीडा क्षेत्राचा विकास तळागाळापासून होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारताला क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेला देश बनवण्यासाठी तळाच्या स्तरावर खेळाडू घडवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
साईच्या मुंबई प्रादेशिक केंद्राच्या सहायक संचालक, अपूर्वा मंदा यांनीही पत्रकारांना साईद्वारे राबवल्या जात असलेल्या अभियानांची आणि इतर प्रमुख उपक्रमांची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली. खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यात क्रीडा विज्ञानाची भूमिका महत्वाची असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. मार्च महिन्यात फिट इंडिया कार्यक्रमाअंतर्गत नियोजित विविध उपक्रमांविषयी देखील त्यांनी सांगितले. आरोग्यविषयक उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा, आणि राष्ट्रीय स्तरावर शारीरिक तंदुरुस्ती विषयक चळवळीला चालना मिळावी या उद्देशाने आखले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यम प्रतिनिधींसोबतच्या या संवादादरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलेल्या खेळाडूंसोबतही संवाद साधला गेला. यात समर्थ म्हकवे आणि प्रगती गायकवाड (कुस्ती), निशांत करंदीकर (कलात्मक जिम्नॅस्टिक्स) आणि ऋषभ दास (जलतरण) यांनी त्यांचे प्रेरणादायी अनुभव माध्यम प्रतिनिधींसमोर मांडले. याशिवाय ऋतुजा पिसाळ (हॉकी) आणि आदित्य अंगल (तलवारबाजी ) यांनीही आपल्या व्हिडीओ संदेशांच्या माध्यमातून या संवादात सहभाग नोंदवला.
या संवादाच्या निमित्ताने आपलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना साईच्या मुंबई प्रादेशिक केंद्रातील अत्याधुनिक क्रीडा विज्ञान सुविधांची पाहणी करण्याचीही संधी दिली केली. याअंतर्गत या माध्यम प्रतिनिधींना खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाची माहितीही दिली गेली. याच बरोबरीने साईने क्रीडापटूंच्या प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक क्षमता वाढवण्यासाठी तयार केलेल्या विज्ञाननिष्ठ पोषण आहार कार्यक्रमांचीही माहिती या प्रतिनिधींना दिली गेली.
या उपक्रमामुळे माध्यम प्रतिनिधींना साईच्या अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांना देशभरात शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्राधिकरणाच्या वतीने नियोजित कार्यक्रम आणि उपक्रमांविषयी जाणून घेता आले.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2108240)
आगंतुक पटल : 28