संरक्षण मंत्रालय
भारताची सुरक्षा साधने ही सायबर युद्धतंत्र, मिश्र युद्धतंत्र, अंतराळ-आधारित आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यासारख्या नव-नव्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असली पाहिजेत: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
प्रगत प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर केवळ सुरक्षा कारवाईसाठीच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन आणि मानवतावादी मदतीसाठी देखील केला पाहिजे: संरक्षण मंत्री
Posted On:
04 MAR 2025 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 04 मार्च 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 4 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीतील डीआरडीओ भवन येथे 'अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती निवारण कार्यांसाठी प्रगत तंत्रज्ञान' या विषयावरील गृह मंत्रालय (एमएचए) - संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) सहयोग परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) अधिकाऱ्यांना त्यांच्या कामकाजातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानातील अद्ययावत प्रगतीसह सुसज्ज करणे हा या दोन दिवसांच्या परिषदेचा उद्देश आहे. या कार्यक्रमाने भारताची अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती प्रतिसाद चौकट मजबूत करण्यात विचारविनिमय आणि सहकार्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मेळाव्याला संबोधित करताना, राजनाथ सिंह यांनी जागतिक सुरक्षेतील वाढती गुंतागुंत आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांमधील वाढत्या परस्परव्याप्तीवर प्रकाश टाकला. "आधुनिक जगात सुरक्षा आव्हाने वेगाने विकसित होत आहेत आणि अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेतील परस्परव्याप्ती वाढत आहे. एक मजबूत, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याची खातरजमा करण्याकरिता आपल्या संस्थांनी सहकार्याने काम करणे अत्यावश्यक आहे," असे त्यांनी सांगितले. विविध सुरक्षा संस्थांमधील प्रयत्न एकवटून आधुनिक तांत्रिक प्रगतीचा फायदा घेत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे समग्रपणे पहिले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
भारताची सुरक्षा साधने ही सायबर युद्धतंत्र, मिश्र युद्धतंत्र, अंतराळ-आधारित आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यासारख्या नव-नव्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असली पाहिजेत याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले. भारताची अंतर्गत सुरक्षा केवळ दहशतवाद, फुटीरतावादी चळवळी आणि नक्षलवादासारख्या पारंपरिक धोक्यांचे व्यवस्थापन करण्याकरिता नव्हे तर देशाच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंधांना अस्थिर करू शकणाऱ्या अपारंपरिक धोक्यांसाठी सज्ज राहण्यासाठी देखील असल्याचे त्यांनी नमूद केले. "आजचे शत्रू नेहमीच पारंपरिक शस्त्रे घेऊन येत नाहीत; सायबर-हल्ले, चुकीची माहिती देणारी मोहीम आणि अंतराळ-आधारित हेरगिरी हे नवीन काळातील धोके ठरत आहेत ज्यासाठी प्रगत उपायांची आवश्यकता आहे," असे त्यांनी सांगितले.
त्यांनी डीआरडीओ आणि गृह मंत्रालयाला एकत्रितपणे काम करून विस्तार करण्यायोग्य उत्पादनांची एक सूची तयार करण्याचे आवाहन केले जे संयुक्तपणे विकसित आणि कालबद्ध पद्धतीने तैनात केले जाऊ शकतात. "आपल्या सुरक्षा दलांना वेळेआधी सज्ज राहण्यासाठी सर्वोत्तम साधने आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. डीआरडीओचे आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करणे उत्साहवर्धक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
केवळ सुरक्षेसाठीच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन आणि मानवतावादी मदतीसाठी देखील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व राजनाथ सिंह यांनी सांगितले.
देशाच्या विविध प्रदेशांना भेडसावणाऱ्या विशिष्ट सुरक्षा आव्हानांवर केंद्रित परिषदा आयोजित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. “भारतातील सुरक्षा धोके एकसमान नाहीत. आपल्याला प्रदेश-विशिष्ट आव्हाने आणि उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या समर्पित परिषदा आयोजित करण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108153)
Visitor Counter : 19