वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एएमएफआय शिखर परिषद 2025 मध्ये भारताच्या विकासात म्युच्युअल फंड उद्योगाच्या भूमिकेवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा भर
लहान गुंतवणूकदारांना सुरक्षित करण्याचे आणि बाजारातील अस्थिरता कमी करण्याचे गोयल यांचे उद्योगांना आवाहन
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार नव्हे तर देशांतर्गत गुंतवणूकदार भारताचे भविष्य घडवतील: गोयल
Posted On:
01 MAR 2025 8:12PM by PIB Mumbai
म्युच्युअल फंड उद्योगाने आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देऊन आणि उद्योग आणि गुंतवणूकदारांपर्यंत अभिनव आर्थिक संकल्पना पोहोचवून भारताच्या विकासगाथेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) म्युच्युअल फंड शिखर परिषद 2025 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

कोविडनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) निर्माण केलेली पोकळी भरून काढल्याबद्दल मंत्र्यांनी देशांतर्गत गुंतवणूकदारांचे कौतुक केले. “देशांतर्गत गुंतवणूकदारांसह एसआयपी सारख्या सामूहिक गुंतवणूक पद्धतींनी बाजाराला पाठबळ दिले. त्यांनी देशाच्या प्रत्येक भागात आर्थिक जागरूकता आणि वित्तीय उत्पादने पोहोचवण्यात मदत केली, असे ते म्हणाले.
लहान गुंतवणूकदार आणि इतर प्रमुख हितधारकांचे महत्त्व जपण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, गोयल यांनी उद्योग धुरिणांना शेअर बाजारातील अस्थिरता कमी करण्याच्या मार्गांवर विचार करण्याचे आवाहन केले. मोठ्या प्रमाणात निधीचा ओघ, भांडवल वापरण्याची बाजारपेठेची सक्ती, आकर्षक समभाग गमावल्याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये भीती यामुळे धोरणात्मक दृष्टिकोन आखताना (राईटसाइझिंग) गुंतवणूकदारांमध्ये चिंता होती. बाजाराच्या एकतर्फी मार्गावर जाण्याच्या अमर्याद क्षमतेबद्दल अनेक चुकीच्या माहितीचा प्रवाह आहे, असे त्यांनी नमूद केले आणि शेअर बाजाराची अनिश्चितता ही उद्योग आणि त्याच्या लहान गुंतवणूकदारांसाठी एक धोक्याची घंटा असल्याचे निदर्शनास आणले.
एएमएफआयने दिशाभूल झालेल्या गुंतवणूकदारांना इतरांपासून वेगळे करून त्यांच्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी. अलिकडच्या अशांततेदरम्यान धाडसी कंपन्यांनी शेअर बाजारात वाजवी किमती राखल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. बाजाराप्रति उद्योगाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अल्पावधीत गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या फायदेशीर परताव्यापेक्षा जास्त आहेत याकडे लक्ष वेधताना सरकारी खर्च आणि खाजगी भांडवली खर्च पुनरागमनाची चिन्हे दर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
म्युच्युअल फंड उद्योगाच्या गुंतवणूकदारांप्रति असलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल सविस्तरपणे सांगताना, गुंतवणूकदारांना जोखीम घेण्यापासून सावध करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याचे आवाहन मंत्र्यांनी सहभागींना केले. अशा उपक्रमांमुळे पुढील 22 वर्षांसाठी भारताच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गुंतवणूकदारांना पाठिंबा देण्याचे आणि मदत करण्याचे, आर्थिक समावेशनाकडे सामूहिक जबाबदारी म्हणून पाहण्याचे आणि आर्थिक शिक्षणाला त्यांचे कर्तव्य म्हणून स्वीकारण्याचे आवाहन गोयल यांनी गुंतवणूकदारांना केले.
म्युच्युअल फंड उद्योगातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयुएम) जवळजवळ 70 लाख कोटी रुपये आहे आणि लवकरच ती 100 लाख कोटी रुपये होईल आणि परदेशी गुंतवणूकदार नव्हे तर देशांतर्गत गुंतवणूकदार भारताचे भविष्य घडवतील असे प्रतिपादन गोयल यांनी केले. संपत्ती निर्माते म्हणून उद्योगाला निष्पक्ष आणि संघटित बाजारपेठ असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107452)
Visitor Counter : 40