विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी चंदीगड येथे सीएसआयआर-आयएमटीईसीएच मधील संशोधन सुविधांचा घेतला आढावा, सूक्ष्मजीव भांडाराची तपासणी केली आणि संस्थेत सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली

Posted On: 26 FEB 2025 5:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी 2025

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज चंदीगडस्थित सीएसआयआर-सूक्ष्मजीवशास्त्रीय तंत्रज्ञान (सीएसआयआर-आयएमटीईसीएच) संस्थेतील सूक्ष्मजीव भांडार आणि इतर सुविधांचा आढावा घेतला. संस्थेत सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांची देखील त्यांनी माहिती घेतली.

या आढाव्यादरम्यान, आगामी पिढीतील औद्योगिक क्रांतीला आकार देण्यात सूक्ष्मजीवशास्त्रीय तंत्रज्ञानाच्या वाढत्या महत्त्वावर अधिक भर देत केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी हे तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञानाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे हे अधोरेखित केले.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी जैवउत्पादन तसेच जैवकारखाने यांच्यावर नव्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या नव्या बायोई3 या पथदर्शी धोरणाच्या प्रस्तावाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची वेगवान प्रगती अधोरेखित करून ते म्हणाले, “भारताच्या जैवअर्थव्यवस्थेने वर्ष 2014 मधील 10 अब्ज डॉलर्स मूल्यावरून 2024 पर्यंत 130 अब्ज डॉलर्सपर्यंत झेप घेतली असून 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.” 

पालमपूर येथील सीएसआयआर- हिमालयीन जैवसंसाधन तंत्रज्ञान संस्थेशी (सीएसआयआर-आयएचबीटी) दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले जात केंद्रीय मंत्री डॉ.सिंह यांनी तेथील अनेक नव्या सुविधांचे उद्घाटन केले आणि महत्त्वपूर्ण शास्त्रीय चर्चांमध्ये भाग घेतला. केंद्रीय मंत्र्यांनी  बदलत्या हवामानात अधिक उंचीवरील वनस्पतींचे अनुकूलन (एचईपीएसीसी) या विषयावरील ईएमबीओ कार्यशाळेत भाग घेतला, तसेच ते उद्योग क्षेत्र,शेतकरी आणि शिक्षण क्षेत्र (आयएफए) च्या बैठकीत उपस्थित राहिले. अशा प्रकारचे उपक्रम वैज्ञानिक प्रगती, आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत कृषी पद्धतीप्रती भारत सरकारच्या बांधिलकीचे दर्शन घडवतात हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील नव्या टयुलीप बागांचे देखील उद्घाटन केले.पालमपूरस्थित सीएसआयआर-आयएचबीटी संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाचे कौतुक करून ते म्हणाले की त्यांच्या वैज्ञानिक हस्तक्षेपांतून इतर हंगामात देखील अधिक विस्तृत क्षेत्रावर टयुलीपची लागवड शक्य झाली आहे. इतर भागांमध्ये देखील हाच नमुना अनुसरत अशाच बागांची लागवड करता येईल असे ते म्हणाले. या कार्यक्रमांसह, कृषी क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देणाऱ्या पालमपूर येथील या संस्थेच्या पाठबळावर कार्यरत कृषी-स्टार्ट अप उद्योगांनी विकसित केलेल्या उत्पादनांचे देखील त्यांनी अनावरण केले.

केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी स्वायत्त हरितगृह, हिंग बिजोत्पादन केंद्र, हिंग क्यूपीएम सुविधा, सजावटीचे कंद प्रक्रिया सुविधा आणि फायटो-अॅनालिटीकल सुविधा यांचे देखील उद्घाटन केले.

त्यासोबतच केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी फायटो फॅक्टरी सुविधेची पायाभरणी केली आणि फ्लोरिकल्चर जंक्शनला चांदपूर संशोधन आणि विकास फार्म यांना जोडणाऱ्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे लोकार्पण केले.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2106504) Visitor Counter : 19