वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यवसाय पूरक वातावरण जोपासण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा पुनरुच्चार


पंतप्रधानांच्या अमेरिका आणि फ्रान्स दौऱ्यामुळे अधिक गुंतवणूक आणि सहकार्याचा मार्ग प्रशस्त झाला: पियुष गोयल

विकसित भारत घडविण्यात लघु आणि मध्यम उद्योगांची परिवर्तनकारी भूमिका असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन

Posted On: 25 FEB 2025 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2025

 

देशात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, नियामक चौकटीचे स्थैर्य सुनिश्चित करणे आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) ने 24 जानेवारी 2025 रोजी आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद 2025 ला दूरदृश्य प्रणाली द्वारे संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि फ्रान्सच्या भेटीमुळे अधिक गुंतवणुकीचा आणि सहकार्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत नवे व्यापारी कल जाणून घेतले जातील, मजबूत सहकार्य  निर्माण केले जाईल आणि विकसित भारत घडविण्यासाठी  लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एसएमई) परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकला जाईल, असे ते यावेळी म्हणाले. या परिषदेत 20 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी सहभागी होत असून, यामधून भारताच्या लवचीकतेवरील जगाचा विश्वास प्रतिबिंबित होतो, असे त्यांनी नमूद केले.

स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी तर उद्योजकांना सक्षम बनवणाऱ्या ‘डीप टेक फंड’ची तरतूद करून केंद्रीय अर्थसंकल्पाने आपली वचनबद्धता सिध्द केल्याचे ते म्हणाले. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेसाठी (एएनआरएफ) उच्चस्तरीय समिती बरोबरच 20,000 कोटी रुपयांच्या प्राथमिक अंदाजासह, संशोधन आणि विकासासाठी केलेली मोठी गुंतवणूक, गुंतवणुकीला अनुकूल निर्देशांक आणि जनविश्वास 2.0, हे उपक्रम विश्वासावर आधारित प्रशासनाला आणखी चालना देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

'पूर्वेचे डेट्रॉइट' म्हणून ओळखले जाणारे पुणे, हे नवोन्मेषाचे केंद्र असल्याचे नमूद करून, ते म्हणाले की, हे शहर उद्योगांसाठी नवे मानक प्रस्थापित करत आहे, ज्यामुळे सहकार्याला आणि भारताच्या विकासगाथेला चालना देणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी हे आदर्श ठिकाण बनले आहे.

उद्योग क्षेत्रातील नेतृत्व आणि दूरदर्शी व्यक्तींचा प्रेरणादायी संगम घडवून आणल्याबद्दल गोयल यांनी एमसीसीआयए ची प्रशंसा केली, आणि ते म्हणाले की, या 90 वर्षे जुन्या संस्थेने महाराष्ट्र आणि भारतभर प्रगतीला बळ देण्यात, उद्योजकांचे सक्षमीकरण करण्यात आणि  विकासाला चालना देण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावली आहे.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106216) Visitor Counter : 10


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil