आयुष मंत्रालय
पारंपरिक भारतीय औषधशास्त्राच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या आयुर्वेदातील दिग्गजांचा आयुष मंत्रालयाने केला "राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार" देऊन सन्मान
जागतिक आरोग्यनिगा क्षेत्रात भारताच्या अतिशय मोठ्या योगदानाचे दर्शन राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारातून घडत आहेः केंद्रीय आयुष राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन
Posted On:
24 FEB 2025 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2025
पारंपरिक भारतीय औषधशास्त्राच्या क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या तीन नामवंत आयुर्वेद व्यावसायिकांचा आयुष मंत्रालयाने प्रतिष्ठेचा “ राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार” देऊन सन्मान केला आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मुंबईत 20 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात तीन नामवंत वैद्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.


नामवंत नाडी वैद्य आणि लेखक वैद्य ताराचंद शर्मा, सहा दशकांहून अधिक काळाच्या सेवेचा अनुभव असलेले द्रव्यगुण विज्ञानातील सुप्रसिद्ध विद्वान वैद्य मायाराम उनियाल आणि विश्व व्याख्यानमाला राष्ट्रीय परिषदेचे संस्थापक वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. स्मृतिचिन्ह, भगवान धन्वंतरींची मूर्ती असलेली ट्रॉफी आणि पाच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचे जतन करत असतानाच समग्र आरोग्यनिगा सेवांचा विस्तार करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतात.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले. जागतिक आरोग्यनिगा क्षेत्रात भारताच्या अतिशय मोठ्या योगदानाचे दर्शन राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारातून घडत आहे, असे प्रतिपादन प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले.आयुर्वेदाचा जगभरात प्रसार करण्यासाठी या द्रष्ट्या आयुर्वेद तज्ञांनी असामान्य बांधिलकीचे दर्शन घडवले आहे, पारंपरिक ज्ञानाचे आधुनिक आरोग्यनिगा प्रणालीसोबत एकात्मिकरणाच्या आमच्या अभियानासाठी त्यांचे हे योगदान यथायोग्य आहे , असे ते म्हणाले.
त्यांच्या या दृष्टीकोनामध्ये आणखी भर घालत आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले, “ अनेक दशकांचे संशोधन आणि नवोन्मेष यांच्या माध्यमातून या वैद्यक व्यावसायिकांनी आयुर्वेद व्यवसायाला त्याचा अस्सलपणा कायम राखून आधुनिकतेची जोड दिली आहे. समकालीन आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी पांरपरिक ज्ञानाचा कशा प्रकारे अंगिकार करता येतो हे त्यांच्या कार्याने दाखवून दिले आहे.”
नाडी वैद्य म्हणून निष्णात असलेले वैद्य ताराचंद शर्मा यांनी स्वतःला अंतर्दृष्टीपूर्ण लेखक म्हणूनही प्रस्थापित केले आहे. त्याच प्रकारे द्रव्यगुण विज्ञानातील दूरदर्शी म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशातील वैद्य मायाराम यांचे देखील कार्य प्रेरणादायी आहे. सहा दशकांपेक्षा जास्त काळ अचल समर्पित वृत्तीने सेवेसह त्यांच्या विपुल लिखाणाने आणि उत्कृष्ट प्रशासनाने अनेकांना प्रेरित केले आहे.
चार दशकांहून अधिक काळ सेवेचे योगदान देणारे वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे देखील या दिग्गजांच्या मांदियाळीतील आहेत. विश्व व्याख्यानमाला राष्ट्रीय परिषद आणि विश्व आयुर्वेद प्रबोधिनी संस्थापक म्हणून त्यांनी आयुर्वेदाच्या शिक्षणात परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे केवळ नावीन्यपूर्ण चिकित्सेलाच चालना मिळालेली नसून समकालीन आरोग्य सुविधांमध्ये आयुर्वेदाची कालसापेक्षता समृद्ध करणाऱ्या जागतिक संवादांची निर्मिती झाली आहे.
काळाच्या ओघात कोरलेला वारसाः राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारांचा इतिहास
राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारांची गाथा परंपरा, उत्कृष्टता आणि दूरदृष्टीची आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारे हे पुरस्कार, आयुर्वेदाला आपले जीवन समर्पित करणाऱ्या दिग्गजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येतात.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105958)
Visitor Counter : 16