संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना

Posted On: 22 FEB 2025 10:02AM by PIB Mumbai

 

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे. येत्या 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत जपानच्या पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात हा सराव होणार आहे. धर्म गार्डियन या लष्करी सरावाचे दरवर्षी भारत आणि जपानमध्ये आलटून पालटून आयोजन केले जाते. याआधी फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये भारतात राजस्थानमध्ये या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या सरावात सहभागी होत असलेल्या भारतीय तुकडीत 120 जवानांचा समावेश आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या या तुकडीत प्रामुख्याने मद्रास रेजिमेंटच्या एका बटालियनचे जवान तसेच इतर सशस्त्र आणि सेवांमधील जवानांचा समावेश आहे. तर जपानानच्या ग्राऊंड सेल्फ डिफेन्स फोर्सच्या तुकडीतही 120 जवानांचा समावेश आहे. या तुकडीचे प्रतिनिधित्व त्यांची 34 वी इन्फंट्री रेजिमेंट करत आहे संयुक्त राष्ट्रांच्या धोरणानुसार शहरी युद्ध आणि दहशतवादविरोधातील संयुक्त मोहीमा राबवताना दोन्ही देशांच्या संरक्षण दलांमध्ये कार्यान्वयनाच्या दृष्टीने परस्पर समन्वय वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे. उच्च प्रतीची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त धोरणात्मक प्रात्यक्षिक सराव यावर या सरावात भर दिला जाणार आहे. या संयुक्त सरावाअंतर्गत कार्यान्वयन क्षमतेत वृद्धी करणे, उच्च गुणवत्तेची युद्ध कौशल्ये आत्मसात करणे आणि संयुक्त मोहीमांच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी परस्पर कार्यान्वयन अधिक सक्षम करण्यासाठी आखलेले सराव प्रात्यक्षिके, संयुक्त नोहीमांचा सराव आणि आपत्ती प्रतिसाद रणनीती विषयक सराव केले जाणार आहेत. अलिकडेच भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी 14 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जपानला भेट दिली होती. या पाश्र्वभूमीवर आयोजित होत असलेल्या धर्म गार्डियन या संयुक्त सरावाच्या यंदाच्या पर्वामुळे भारत आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक बळकट होणार आहे. या सरावातून स्वतंत्र, मुक्त आणि सर्वसमावेशक भारत - प्रशांत क्षेत्रासाठीच्या भारत आणि जपानच्या एकसामायिक दृष्टीकोनाला पुढे नेतानाच प्रादेशिक सुरक्षा, शांतता आणि स्थैर्याबद्दलची भारत आणि जपानची सामायिक वचनबद्धताही अधोरेखित होते. 'धर्म गार्डियन' हा संयुक्त सराव म्हणजे भारत आणि जपानमधील परस्पर संबंधांमधील प्रादेशिक सहकार्याच्या तत्वाचा आधारस्तंभ आहे. या सरावातून दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ होण्यालाही चालना मिळत असून परस्परांमधील सांस्कृतिक आकलनातही यामुळे वृद्धी होते आहे. भारत आणि जपान यांच्यातील मैत्री, विश्वास आणि सांस्कृतिक संबंधांच्या शाश्वत नात्याची साक्ष देणार्‍या या सरावाच्या माध्यमातून दोन्ही देशांकरता परस्पर व्यावसायिक सहभागासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याच बरोबरीने या सरावातून दोन्ही देशांची परस्पर व्यापक संरक्षण सहकार्याबद्दलची अतूट वचनबद्धताही अधोरेखित होते आहे.

***

A.Chavan/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2105453) Visitor Counter : 30