सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी मुंबईतील नाले आणि सेप्टिक टँक सफाई कामगारांना नमस्ते योजनेअंतर्गत स्वच्छता किट आणि आयुष्मान कार्डचे केले वाटप
कचरावेचक देखील नाले आणि सेप्टिक टँक सफाई कामगारांसह नमस्ते योजनेचे लाभार्थी : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार
योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षितता उपाययोजनांद्वारे नाले आणि सेप्टिक टँक सफाई कामगारांची जीवितहानी टाळणे हा नमस्ते योजनेचा उद्देश
मुंबईत 2400 हून अधिक नाले आणि सेप्टिक टँक सफाई कामगारांच्या माहितीचे संकलन
Posted On:
20 FEB 2025 7:52PM by PIB Mumbai
मुंबई, 20 फेब्रुवारी 2025
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज मुंबईत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय यांत्रिक स्वच्छता परिसंस्थेसाठी कृती (नमस्ते) योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता किट आणि आयुष्मान आरोग्य कार्डाचे वाटप केले. याशिवाय, स्वच्छता उद्योग योजनेअंतर्गत (एसयूवाय) यांत्रिक स्वच्छता वाहनांच्या खरेदीसाठी अनुदानित कमी दराच्या कर्जासाठी मंजुरीपत्रे देखील काही लाभार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमात वंचितांच्या कल्याणासाठी सरकारच्या बांधिलकीचा पुननरुच्चार झाला. उपेक्षितांना प्राधान्य देण्याचे हे समर्पण सरकारच्या विकसित भारताच्या व्यापक दृष्टिकोनाचे द्योतक आहे ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला भारताच्या विकास प्रवासात योगदान देण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची संधी मिळते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि सुरक्षितता यांची खातरजमा करून त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (MoSJE) आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) यांनी संयुक्तपणे राबविलेल्या नमस्ते योजनेचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी यावेळी नमूद केले. नाले आणि सेप्टिक टँकच्या धोकादायक स्वच्छतेमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना औपचारिक आणि संस्थात्मक बनवणे आणि प्रशिक्षित स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे सुरक्षित आणि यांत्रिक स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. नमस्ते योजनेत गटार आणि सेप्टिक टँक सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच (एसएसडब्ल्यू) कचरावेचकांनाही लाभार्थी म्हणून समाविष्ट केले असून त्यांची माहिती गोळा केली जात असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
डॉ.कुमार म्हणाले की नमस्ते योजनेचा उद्देश देशातील स्वच्छता कामगारांना किंवा 'स्वच्छता सेनानी'ना प्रशिक्षण देऊन मृत्यूदर शून्यावर आणणे हा नमस्ते योजनेचा उद्देश आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये, अभियंते आणि संबंधित नगरपालिका कर्मचारी देखील भाग घेतील जेणेकरून संपूर्ण व्यवस्था सुसज्ज होईल. या उद्देशाने, देशभरातील सर्व नगरपालिकांमध्ये स्वच्छता कामगारांची माहिती संकलित केली जात असून याद्वारे सुरक्षित कामाची परिस्थिती सुनिश्चित होईल आणि त्यांना पीपीई किट आणि इतर सुरक्षा उपकरणे उपलब्ध होतील असे डॉ. कुमार यांनी सांगितले.
स्वच्छता कामगारांच्या कष्टाळू वृत्तीची प्रशंसा करत डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की संपूर्ण वर्षभर ते करत असलेल्या कष्टांमुळे नागरिक रोगमुक्त राहतात. हे कामगार समाजातील सर्वात महत्त्वाचे घटक असल्याचे सांगत ते म्हणाले की स्वच्छता कामगारांना ते काम करत असलेल्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असावे हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी आपली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या उद्देशाने सर्व राज्यांच्या सामाजिक कल्याण विभागांसोबत बैठकांचे आयोजन करत आहे. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, नमस्ते योजनेतून मिळालेल्या लाभांची माहिती देशाच्या इतर भागातील त्यांच्या सहकाऱ्यांनाही द्यावी असे आवाहन केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी अशी माहिती दिली की मुंबई शहरातील 2485 मैला आणि सेप्टिक टँक कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली आहे आणि नमस्ते योजनेचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. मैला वाहून नेण्यासाठी मानवी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला प्रतिबंध आणि या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन कायदा 2013 ची मुंबईत पुरेपूर अंमलबजावणी केली जात असून शहरात मैलावहनाची शंभर टक्के वहनक्षमता करणारी प्रणाली कार्यरत करण्याचे उद्दिष्ट 2027 पर्यंत साध्य होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण सचिव अमित यादव यांनी माहिती दिली की या योजने अंतर्गत 65,060 स्वच्छता कामगारांची माहिती संकलित केली आहे आणि त्यापैकी 32,734 जणांना पीपीई किट्स देण्यात आले आहेत तर 15,153 कामगारांना आतापर्यंत आयुष्मान आरोग्य पत्रिका देण्यात आल्या आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत नॅशनल सफाई कर्मचारीज फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(NSKFDC) नमस्ते योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागार योगिता स्वरुप मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर, नॅशनल सफाई कर्मचारीज फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (NSKFDC) व्यवस्थापकीय संचालक प्रभात कुमनार सिंग महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लहुराज माळी हे देखील इतर मान्यवरांसोबत यावेळी उपस्थित होते.

S.Bedekar/V.Joshi/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105103)
Visitor Counter : 24