संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त युद्धशास्त्रीय अभ्यास केंद्राने सुरक्षाविषयक समकालीन आव्हानांवर आधारित दोन महत्त्वाच्या प्रकाशनांचे अनावरण केले

Posted On: 18 FEB 2025 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025

केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील एकात्मिक संरक्षण कर्मचारी वर्ग मुख्यालयाच्या अखत्यारीतील संयुक्त युद्धशास्त्रीय अभ्यासकेंद्राने (सीईएनजेओडब्ल्यूएस) युद्धनीतीविषयक विचार आणि धोरणात्मक चर्चा पुढे नेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत 18 फेब्रुवारी 2025 रोजी दोन महत्त्वाच्या प्रकाशनांचे अनावरण केले.एकात्मिक संरक्षण दल प्रमुख आणि सीईएनजेओडब्ल्यूएसचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांनी ‘संयुक्त युध्द प्रकाराला प्रभावित करणारी युद्धशास्त्रीय माहिती’ या संकल्पनेवर आधारित सिनर्जी हे प्रमुख जर्नल जारी केले तसेच ‘रशिया-युक्रेन युध्द: युरोप आणि भारतावरील परिणामांचा शोध’ असे शीर्षक  असलेल्या प्रबंधाचे अनावरण केले.

सखोल विश्लेषणासाठी आणि विचार प्रवर्तक चर्चांसाठी सर्वदूर प्रसिध्द असलेल्या आणि समकालीनांनी पुनरावलोकन केलेल्या सिनर्जी या पत्रिकेचा फेब्रुवारी 2025 चा अंक ही विशेष मेहनत घेऊन तयार केलेली आवृत्ती असून त्यातून समकालीन संरक्षणविषयक आयाम आणि भविष्यवादी धोरणांबाबत व्यापक दृष्टीकोन दिसून येतो. सायबर, मानसशास्त्रीय आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासह आधुनिक संघर्षांमध्ये युध्दनितीविषयक माहितीची भूमिका ही पत्रिका तपासते. हे पुस्तक युध्दशास्त्राच्या भविष्याला आकार देण्यातील तांत्रिक अडचणी, कृत्रिम बुद्धीमत्तेचे, सायबर साधनांचे आणि डिजिटल फसवणुकीचे मूल्यमापन करते  तसेच धोरणात्मक आणि राष्ट्रीय सुरक्षेचे परिणाम आणि भारतापुढील आव्हाने विशेषतः शत्रूविरोधी आयडब्ल्यू तंत्रांना प्रतिसाद म्हणून उभ्या राहणाऱ्या अडचणी यांचे मूल्यांकन करते. तसेच या पुस्तकात संयुक्त दलांची परिणामकारकता वाढवण्याच्या उद्देशाने कमांड,नियंत्रण, दळणवळण,संगणक,हेरगिरी, टेहळणी आणि टोपण (सी4आयएसआर) यंत्रणांच्या अखत्यारित आयडब्ल्यूच्या एकत्रीकरणाविषयी शोध घेतानाच परिचालनात्मक एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर विवेचन करण्यात आले आहे.

‘रशिया-युक्रेन युध्द: युरोप आणि भारतावरील परिणामांचा शोध’ हे शीर्षक असलेल्या प्रबंधातून रशिया-युक्रेन संघर्षाच्या भूराजकीय, आर्थिक आणि सुरक्षाविषयक परिणामांचे सखोल विश्लेषण वाचायला मिळते. हा प्रबंध युरोपातील स्थैर्य, भारत-रशिया संबंध आणि वेगाने उत्क्रांत होत असलेल्या जागतिक व्यवस्थेमध्ये भारताची धोरणात्मक स्थिती यावर या युद्धाचा परिणाम तपासतो. या पुस्तकात  भूराजकीय पुनर्रचना, ऊर्जा सुरक्षाविषयक आव्हाने, भारताचा राजनैतिक समतोल, नाटोचा हिंद-प्रशांत विस्तार, युरोपीय महासंघ-भारत सहयोग आणि जागतिक सुरक्षेवरील दीर्घकालीन परिणाम यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंचा शोध घेण्यात आला आहे.

या दोन महत्त्वाच्या प्रकाशनांच्या अनावरणाद्वारे सीईएनजेओडब्ल्यूएसने समकालीन धोरणात्मक समस्यांविषयी बौद्धिक विचारमंथनाला प्रोत्साहन देण्याच्या बांधिलकीला दुजोरा दिला आहे. धोरणकर्ते, लष्करी व्यावसायिक, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांसाठी महत्त्वाच्या माहितीचा स्त्रोत म्हणून कार्य करत प्रबंध आणि सिनर्जी जर्नल ही दोन्ही प्रकाशने आता सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2104473) Visitor Counter : 19


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil