संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथील एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे केले उद्घाटन
Posted On:
10 FEB 2025 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू येथे एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. भारत पॅव्हेलियन हे देशातील संरक्षण उद्योगांचा ढाचा, विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमतांचे सादरीकरण करत आहे, जे अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे दर्शवले जात आहे. हे ‘आत्मनिर्भरतेचे उड्डाण’ या संकल्पनेला अधोरेखित करते, जी तिन्ही संरक्षण दले आणि अवकाश क्षेत्र यांच्यातील समन्वय तसेच भारताच्या जागतिक एअरोस्पेस आणि संरक्षण महासत्तेकडे वाटचाल दर्शवते.उद्घाटनानंतर, संरक्षण मंत्र्यांनी पॅव्हेलियनमधील विविध दालनांना भेट दिली आणि तेथील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, तसेच त्यांच्या उत्पादनांची पाहणी केली.
भारत पॅव्हेलियनमध्ये 275 हून अधिक प्रदर्शने विविध माध्यमांद्वारे सादर केली जात आहेत. या प्रदर्शनांमध्ये संपूर्ण देशाच्या संरक्षण परिसंस्थेचा समावेश आहे. ज्यामध्ये संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, डिझाइन हाऊसेस आणि खाजगी कंपन्या तसेच एमएसएमई आणि स्टार्ट-अप्स यांचा समावेश आहे.
केंद्रीय क्षेत्रातील प्रदर्शनांमध्ये काही महत्त्वाच्या व्यासपीठांचे प्रभावी दर्शन घडते, ज्यामध्ये अॅडव्हान्स्ड मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट, कॉम्बॅट एअर टीमिंग सिस्टम आणि ट्विन-इंजिन डेक-बेस्ड फायटर यांचा समावेश आहे.
आयडीईएक्स पॅव्हेलियन मध्ये, आघाडीचे नवोन्मेषक देशात विकसित केलेली उत्पादने प्रदर्शित करत आहेत. ही उत्पादने एअरोस्पेस, डिफस्पेस, एअरो स्ट्रक्चर्स, अँटी-ड्रोन सिस्टिम्स, ऑटोनॉमस सिस्टिम्स, रोबोटिक्स, कम्युनिकेशन, सायबरसुरक्षा, सर्वेलेन्स आणि ट्रॅकिंग, अनमॅन्ड ग्राउंड व्हेईकल्स यांसारख्या विविध प्रगत क्षेत्रांमध्ये पसरलेली आहेत.
या पॅव्हेलियनमध्ये आयडीईएक्स सह अभिनव तंत्रज्ञानकुशल विकास योजनेच्या (अदिती) विजेत्यांसाठी एक स्वतंत्र विभाग देखील असेल. या विभागात त्यांची क्रांतिकारी कामे, विशेषतः महत्वपूर्ण आणि विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रांमधील योगदान प्रदर्शित करेल.
संरक्षण मंत्र्यांनी या प्रसंगी आयडीईएक्स अहवाल 2024, आयडीईएक्स कॉफी टेबल बुक आणि आयडीईएक्स फायनान्स मॅन्युअल या तीन प्रकाशनांचे अनावरण केले. आयडीईएक्स रिपोर्ट आणि कॉफी टेबल बुक हे संरक्षण नवोन्मेष पर्यावरणातील प्रमुख टप्पे अधोरेखित करतात आणि नवोन्मेषक तसेच संबंधित भागधारकांच्या योगदानाचा गौरव करतात.
आयडीईएक्स फायनान्स मॅन्युअल विद्यमान वित्तीय प्रक्रियांना सोपे करून प्रकल्पांच्या गतीत वाढ करण्यास मदत करते आणि आयडीईएक्स विजेत्यांसाठी नवोन्मेष प्रक्रियेला अधिक सुलभ बनवते.
कर्नाटक पॅव्हेलियन मध्ये राज्यातील संरक्षण आणि एअरोस्पेस उद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शित केले जात आहे. या नवोन्मेषांमधून कर्नाटकमधील मजबूत संरक्षण आणि एअरोस्पेस परिसंस्थेचा प्रत्यय येतो, ज्याला 2,000 हून अधिक एमएसएमई कंपन्यांचे समर्थन लाभले आहे.
या प्रसंगी कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते.
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101495)
Visitor Counter : 32