विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
लस निर्मिती, चांद्रयान यांसारख्या जागतिक यशोगाथा भारताच्या गगनभरारीची साक्ष देतात - डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
09 FEB 2025 5:10PM by PIB Mumbai
लस निर्मिती आणि चांद्रयान यांसारख्या जागतिक यशोगाथा भारताच्या गगनभरारीची साक्ष देतात असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.
राजधानी दिल्लीत "विज्ञान भारती" च्या नवीन संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते. हे संकुल विज्ञान भारतीची अनेक वर्षांपासूनची गरज होती, असे ते म्हणाले. हा परिसर विचारांच्या देवाणघेवाणीचे केंद्र आणि शिक्षणाचे स्थान म्हणून काम करेल यावर त्यांनी भर दिला.

भारताने विशेषतः आरोग्य सेवेत केलेली लक्षणीय प्रगती डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केली. एकेकाळी उपचारात्मक आरोग्यसेवेसाठी भारताकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते मात्र आता प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेत जागतिक नेतृत्व म्हणून भारत उदयास येत आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात पाश्चात्य देशांनी संभाव्य उपायांसाठी होमिओपॅथी आणि निसर्गोपचाराचा आधार घेतला तेव्हा जगाची पारंपरिक औषधांमध्ये वाढती आवड दिसून आली. टाटा समूहाच्या सहकार्याने अरुणाचल प्रदेशातील रस्ते बांधणीसाठी स्टील स्लॅगचा वापर करण्यात भारताला मिळालेल्या यशाचा त्यांनी उल्लेख केला. तसेच, काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या वेरूळ आणि अजिंठाच्या मार्गांचाही त्यांनी उल्लेख केला.

स्वदेशी प्रतिजैविक नॅफीथ्रोमायसीन (Nafithromycin) ची निर्मिती करून भारताच्या फार्मास्युटिकल्स उद्योगाने अलीकडच्या काळात केलेल्या प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. या यशामुळे भारत पारंपारिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात आघाडीवर आहे, असे ते म्हणाले.
यापुढे एकीकरण हा पर्याय नसून काळाची गरज आहे यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. विज्ञान भारती ने व्यापक वैज्ञानिक एकात्मतेचे प्रमुख माध्यम बनावे, असे आवाहन त्यांनी केले. हे प्रयत्न भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जागतिक शक्तीस्थान म्हणून उदयास आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101174)
Visitor Counter : 56