संसदीय कामकाज मंत्रालय
सरकारसोबत आज करण्यात आले राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन
36 राजकीय पक्षांच्या 52 नेत्यांची बैठकीला उपस्थिती
Posted On:
30 JAN 2025 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
संसदेमधील आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 संदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आज (30 जानेवारी, 2025) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे नवी दिल्लीतील संसद भवन संकुलात आयोजन करण्यात आले. संसदीय व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय आऱोग्य आणि कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा, विधि आणि न्याय राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री व माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे देखील यावेळी उपस्थित होते. या बैठकीला मंत्र्यांसहित 36 राजकीय पक्षांचे एकूण 52 नेते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रास्ताविक केले आणि बैठकीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांचे स्वागत केले. त्यानंतर संसदीय व्यवहारमंत्र्यांनी माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात शुक्रवारी 31 जानेवारी 2025 रोजी सुरुवात होईल आणि सरकारच्या कामकाजाच्या आवश्यकतेनुसार हे अधिवेशन 4 एप्रिल 2025 रोजी संस्थगित होईल. या काळात संसदेच्या स्थायी समितीला विविध मंत्रालये/ विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांची छाननी करण्यासाठी आणि त्यांचे अहवाल तयार करण्यासाठी दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी 13 फेब्रुवारी 2025 रोजी अवकाशासाठी स्थगित होईल आणि 10 मार्च 2025 रोजी अधिवेशन पुन्हा सुरू होईल. अधिवेशन काळात 64 दिवसांच्या कालावधीत एकूण 27 बैठकांचे( पहिल्या टप्प्यात 9 बैठका आणि दुसऱ्या टप्प्यात 18 बैठका) आयोजन होईल.
दोन्ही सभागृहांच्या नियमांनुसार सभागृहांमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती संसदीय व्यवहारमंत्र्यांनी दिली. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जे विषय उपस्थित करण्यात येण्याची शक्यता आहे त्याविषयी या नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. संसदीय व्यवहार मंत्र्यांनीदेखील या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल आणि आपले विचार व्यक्त केल्याबद्दल आणि त्यांच्या सक्रीय आणि परिणामकारक सहभागाबद्दल सर्व नेत्यांचे आभार मानले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 दरम्यान मांडण्यात येण्याची शक्यता असलेल्या विधेयकांची यादी
I – वैधानिक कामकाज
- बँकिंग कायदे ( सुधारणा) विधेयक, 2024
- रेल्वे (सुधारणा) विधेयक, 2024
- आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024
- तेलक्षेत्र(नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, 2024
- बॉयलर विधेयक, 2024
- गोव्याच्या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक, 2024
- वक्फ (सुधारणा) विधेयक, 2024
- मुसलमान वक्फ (रद्दबातल) विधेयक, 2024
- बिल्स ऑफ लेडिंग (जहाजावर मालभारण )विधेयक, 2024
- समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक, 2024
- किनारपट्टी नौवहन विधेयक, 2024
- मर्चंट शिपिंग विधेयक, 2024
- वित्त विधेयक, 2025
- हवाई वाहनांमधील हितसंबधांचे संरक्षण विधेयक, 2025
- त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक, 2025
- स्थलांतर आणि परदेशी व्यक्ती विधेयक, 2025
II – आर्थिक कामकाज
- 2025-26 या वर्षासाठी लेखानुदानावर चर्चा आणि मतदान आणि विनियोजन विधेयक संबंधित मांडणे, विचार आणि मंजुरी/ परत पाठवणे
- 2024-25 या वर्षाच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांच्या दुसऱ्या आणि अखेरच्या संचावर चर्चा आणि मतदान आणि विनियोजन विधेयक संबंधित मांडणे, विचार आणि मंजुरी/ परत पाठवणे
- 2021-22 या वर्षाच्या अतिरिक्त अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान आणि विनियोजन विधेयक संबंधित मांडणे, विचार आणि मंजुरी/ परत पाठवणे.
* * *
S.Kakade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2097772)
Visitor Counter : 12