सांस्कृतिक मंत्रालय
देवी अहिल्याबाई होळकर: एक द्रष्ट्या नेत्या ज्यांनी सामर्थ्य आणि करुणेला मूर्त रूप दिले - प्रा. उमा वैद्य
इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सद्वारे देवी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आणि वारसा या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन
Posted On:
30 JAN 2025 10:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सने लोकमाता अहिल्याबाई त्रिशताब्दी समारोह समितीच्या सहकार्याने देवी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आणि वारसा या विषयावर ‘देवी अहिल्या – सम्राज्ञी संन्यासिनी ’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. उमा वैद्य यांनी हे व्याख्यान दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सच्या विश्वस्त पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंग होत्या.

प्रा. उमा वैद्य यांनी लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय योगदानावर सखोल माहिती दिली. देवी आणि अहिल्या या शब्दांच्या मतितार्थावर भर देत त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या 70 वर्षांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. राज्य करताना कर्तबगारी दाखवण्याबरोबरच रयतेप्रति ममत्व असलेल्या अहिल्यादेवींचे जीवन हे एका सच्च्या नेत्याच्या मूल्यांचे द्योतक आहे, असे त्या म्हणाल्या.
आर्थिक, राजकीय, राजनैतिक आणि लष्करी क्षेत्रात त्यांच्या योगदानाची व्याप्ती असून त्यांच्या परोपकार आणि सार्वजनिक सेवेच्या बांधिलकीला ते पूरक होते. शक्ती आणि करुणा, मूल्ये आणि कृती यात संतुलन साधणाऱ्या महिला शासकाचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत. अहिल्याबाई खरोखरच 'सम्राज्ञी संन्यासिनी' या पदवीला पात्र आहेत - ज्यांनी त्यांच्या रयतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थपणे सत्तेचा वापर केला, असे सांगून प्रा. उमा वैद्य यांनी अहिल्याबाईंचे अलौकिकत्व उपस्थितांसमोर उलगडले.
* * *
S.Kakade/Sushma/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097770)