उपराष्ट्रपती कार्यालय
कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते - उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
Posted On:
24 JAN 2025 1:43PM by PIB Mumbai
भारतरत्न कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते होते, त्यांनी आरक्षण लागू केले आणि लोकसंख्येतल्या मोठ्या प्रमाणातील वंचित वर्गासाठी असंख्य संधी उपलब्ध करून दिल्या, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे.
कर्पूरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त बिहारमधील समस्तीपूर इथे आज स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी संबोधित केले. भारताचे थोर सुपुत्र असलेले कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे देवदूत आहेत. कर्पूरी ठाकूर यांनी अल्पावधीतच सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचा नवा इतिहास लिहिला. शतकानुशतके चालत आलेल्या चालीरिती त्यांनी मोडीत काढल्या आणि लोकसंख्येतल्या मोठ्या प्रमाणातील वंचित वर्गासाठी असंख्य संधीची दारे खुली केली अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी कर्पूरी ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. ते समानतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारे महापुरुष होते. सामाजिक व्यवस्थेत वंचित राहिलेल्या, सर्वांनी दुर्लक्षित केलेल्या लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले असेही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांनी सामाजिक न्यायाला चालना देऊन देशाच्या इतिहासात आपल्या कर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ते एक असे व्यक्तीमत्व होते, ज्यांनी कधीही संपत्ती गोळा केली नाही, त्याउलट त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेसाठी समर्पित केले असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या संबोधनातून कर्पूरी ठाकूर यांच्या स्वभावातील दूरदृष्टीत्वाचा पैलुही उपस्थितांसमोर मांडला. कर्पूरी ठाकूर हे मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांनी वर्तमान आणि भविष्य या दोन्हींचा विचार केला. त्यांनी विरोधाची पर्वा न करता आरक्षण लागू केले. हा एक नवा अध्याय होता असे ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान कृषिमंत्र्यांनी आपल्या संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे कर्पूरी ठाकूर यांनी इंग्रजीची सक्ती संपुष्टात आणली आणि सरकारी कार्यालयांमध्ये हिंदीच्या वापराला प्रोत्साहन दिले. मात्र या निर्णयाबद्दल त्यांना टीकाही सहन करावी लागल्याच्या बाबीलाही उपराष्ट्रपतींनी दुजोरा दिला. कर्पूरी ठाकूर हे किती दूरदर्शी होते, हे आपल्याला आता कळू लागले असल्याचेही ते म्हणाले. कर्पूरी ठाकूर हे शिक्षणावर भर देणारे देशातील पहिले मुख्यमंत्री होते आणि राज्यात इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते ही बाबही उपराष्ट्रपतींनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2095792)
Visitor Counter : 51