संरक्षण मंत्रालय
नवव्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी माजी सैनिक रॅली आणि पुष्पचक्र अर्पण समारंभांचे आयोजन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मूमध्ये अखनूर येथे 1000 माजी सैनिकांबरोबर साजरा केला सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस
सरकार प्रत्येक पावलावर सैनिकांच्या पाठीशी उभे असून त्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी काम करत राहणार असल्याची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही
पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या मुकुटातील हिरा असून, पाकिस्तानसाठी तो परकीय भूप्रदेशापेक्षा अधिक काही नाही : राजनाथ सिंह
Posted On:
14 JAN 2025 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025
14 जानेवारी 2025 रोजी देशभरात विविध ठिकाणी 9 वा सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने माजी सैनिकांना त्यांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल आदरांजली वाहण्यासाठी आणि या शूरवीरांच्या नातेवाईकांप्रति एकता दृढ करण्यासाठी जम्मू, मुंबई, नवी दिल्ली, पुणे, नागपूर, विशाखापट्टणम, बंगळुरू, बरेली, जयपूरआणि सिलीगुडी यासह अनेक ठिकाणी माजी सैनिक रॅली आणि पुष्पहार अर्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मूमध्ये अखनूर येथील टांडा आर्टिलरी ब्रिगेडमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमारे एक हजार माजी सैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी माजी सैनिकांशी संवाद साधला. तसेच अतुलनीय शौर्य, समर्पण, त्याग आणि देशभक्तीने देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल, सशस्त्र दलाच्या निवृत्त आणि सेवेत असलेल्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. देश सशस्त्र दलांचा सदैव ऋणी राहील असे सांगून ते म्हणाले की, देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात अत्यंत आदर आहे. सैनिकांबद्दलचा हा आदर देशाच्या मूल्यांमध्ये रुजलेला आहे, असे सांगून ते म्हणाले की, माजी सैनिक दिवस कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे, हा आदर भाव प्रदर्शित करण्याचा एक मार्ग आहे.
अखनूर येथील माजी सैनिक दिन सोहळा म्हणजे, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, याची साक्ष देणारा कार्यक्रम असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या मुकुटातील हिरा असून, पाकिस्तानसाठी तो परकीय भूप्रदेशापेक्षा अधिक काही नाही. 'पाकव्याप्त काश्मीरशिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे, असे ते म्हणाले. तिथल्या जनतेला सन्मानाने जगण्यापासून वंचित ठेवले जात आहे. धर्माच्या नावाखाली त्यांची दिशाभूल करून, पाकिस्तान त्यांना भारताविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जात आहे. सीमेलगतच्या भागात दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू असून लाँच पॅड तयार करण्यात आले आहेत. भारत सरकारला परिस्थितीची चांगली जाणीव आहे, आणि पाकिस्तानला आपले कुटील मनसुबे थांबवावे लागतील, असे ते म्हणाले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना संरक्षणमंत्र्यांनी माजी सैनिक, सेवेत असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. निवृत्तीनंतरही देशाचा अमुल्य ठेवा असलेल्या आपल्या जवानांच्या कल्याणासाठी संरक्षण मंत्रालय नेहमीच क्षमतेपलीकडे काम करेल, आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या पावलांची माहिती देऊन, सरकार प्रत्येक पावलावर देशाच्या सैनिकांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राजनाथ सिंह यांनी 108 फूट उंच राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि ‘अखनूर वारसा वस्तुसंग्रहालया ’चे उद्घाटन केले. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे या भागाचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीविषयी असलेली कृतज्ञता होय. जम्मू ते पूंछला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग NH-144A वर उभारलेले हे वस्तुसंग्रहालय या प्रदेशाचा गौरवशाली इतिहास आणि वारशाचे दर्शन घडवते.
याप्रसंगी माजी सैनिकांना मोटाराइज्ड व्हीलचेअर्स, ट्राय स्कूटर, स्कूटर आणि ऑटो रिक्षा अशी वाहने आणि उपकरणे प्रदान करण्यात आली. याशिवाय माजी सैनिकांच्या समस्यांचे तिथल्या तिथे निराकरण करण्याच्या उद्देशाने आणि जनजागृतीकरता विविध अभिलेख कार्यालये, संरक्षण आणि सरकारी कल्याणकारी संस्था, बँका आणि रोजगार संस्थांचे 40 हून अधिक स्टॉल्स/मदत कक्ष स्थापन करण्यात आले होते.
या दिवसाचे औचित्य साधून संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मुंबईत, नेव्हल डॉकयार्ड येथे गौरव स्तंभाला (समुद्र विजय स्मारक ) पुष्पहार अर्पण केला.
यानंतर भारतीय नौदल नाविक संस्था (INSI सागर) येथे तिन्ही सेवा दलातील माजी सैनिकांची रॅली झाली, संरक्षण राज्यमंत्र्यांनी उपस्थित माजी सैनिकांशी संवाद साधला. या रॅली मध्ये सुमारे 400 माजी सैनिक सहभागी झाले होते. माजी सैनिकांचे समर्पण, मूल्य आणि शिस्त, देशवासियांसाठी प्रेरणादायी असल्याचे संजय सेठ यांनी या सांगितले. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुण्यातील सशस्त्र सेना माजी सैनिक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी होते, तर नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाला चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल जे पी मॅथ्यू, लष्कर आणि नौदलाचे उपप्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमांना तिन्ही सेवांमधील माजी सैनिक उपस्थित होते.
1953 मध्ये या दिवशी सेवानिवृत्त झालेले सशस्त्र दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ दरवर्षी 14 जानेवारी रोजी सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 2016 मध्ये साजरा करण्यात आला होता. माजी सैनिकांच्या सन्मानार्थ अशा संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
N.Chitale/R.Agashe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092870)
Visitor Counter : 22