मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्र्यांच्या हस्ते उद्योजकता विकास परिषद 2025 चे उद्घाटन , "उद्योजकांचे सक्षमीकरण: पशुधन अर्थव्यवस्थेचे परिवर्तन"ही परिषदेची संकल्पना

Posted On: 13 JAN 2025 7:43PM by PIB Mumbai

पुणे , 13 जानेवारी 2025


पुण्यातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे  आज 13 जानेवारी 2025 रोजी “उद्योजकांचे सक्षमीकरणः पशुधन अर्थव्यवस्थेचे  परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन  करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री  राजीव रंजन सिंह  उर्फ ललन सिंह यांनी केले. राज्यमंत्री  एस पी सिंह बघेल आणि जॉर्ज कुरियन हे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे या देखील यावेळी उपस्थित होत्या.

या परिषदेदरम्यान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी राष्ट्रीय पशुधन अभियान आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत प्रत्येकी 20 अशा एकूण 40 प्रकल्पांचे उद्घाटन केले. मंत्र्यांनी प्रदर्शनातील स्टॉल्सना भेट दिली, उद्योजकांशी संवाद साधला आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी साठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना तसेच उद्योजकता कार्यक्रमासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांना गौरवण्यात आले. कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक या बँकांनी  या योजनांतर्गत केलेल्या पतपुरवठ्याची दखल यावेळी घेण्यात आली.

याप्रसंगी मंत्र्यांनी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) आणि राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम) लाभार्थ्यांच्या यशोगाथा अधोरेखित करणारे दोन संग्रह प्रकाशित केले. तसेच  राष्ट्रीय पशुधन योजनेची मार्गदर्शक तत्वे 2.0 आणि एनएलएम  योजनेवर देखरेखीसाठी डॅशबोर्ड चे उद्‌घाटन केले.याव्यतिरिक्त, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने 14 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा कालावधी "पशुसंवर्धन आणि पशु कल्याण माह " म्हणून घोषित केला आहे आणि या दरम्यान देशभरात जनजागृती मोहीम आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातील.

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री  राजीव रंजन सिंह यांनी या परिषदेच्या आयोजनाबद्दल पंकजा मुंडे आणि महाराष्ट्र सरकार यांचे आभार मानले. ग्रामीण आर्थिक विकासात पशुसंवर्धनाची भूमिका, “एफएमडी मुक्त भारत” उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण (एफएमडी) कार्यक्रमांची गरज आणि महाराष्ट्रासह नऊ एफएमडी मुक्त क्षेत्रांची निर्मिती या बाबी अधोरेखित केल्या.  त्यांनी सरकारी उद्योजकता कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि बँकांना शेतकरी तसेच  महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे आवाहन केले.

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत 24 जून 2020 रोजी सुरू करण्यात आलेला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी आता अतिरिक्त निधी आणि विस्तारित लाभांसह 17,296 कोटी रुपये खर्चासह दुग्ध  प्रक्रिया, मांस प्रक्रिया, खाद्य उत्पादन आणि पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना पाठबळ देतो अशी माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंत, 10,356.90 कोटी रुपये खर्चासह 362 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 247.69 कोटी रुपये व्याज सवलत स्वरूपात जारी करण्यात आले आहेत.

त्यांनी पुढे नमूद केलं की 2021 मध्ये  पुनर्रचित एनएलएम योजनेअंतर्गत सुरू केलेला एनएलएम-ईडिपी उपक्रमात  कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, डुक्कर, उंट आणि इतर पशुधन प्रकल्पांसाठी तसेच खाद्य प्रक्रिया आणि ग्रेडिंग पायाभूत सुविधांसाठी 50 लाख रुपयांपर्यंत 50% भांडवली अनुदान  प्रदान करण्याची तरतूद आहे. आतापर्यंत,1,005.87 कोटी रुपये अनुदानांसह एकूण 2,182.52 कोटी खर्चाचे 3,010 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. ही योजना जनुकीय विकास कार्यक्रम, खाद्य  आणि चारा उपक्रम तसेच  राज्य वर्गीकरणाच्या आधारे  प्रीमियम सबसिडीसह पशुधन विमा देखील पुरवते.

आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी या क्षेत्राच्या वाढीसाठी, उत्पादकता वाढीसाठी उद्योजकतेच्या महत्त्वावर भर दिला आणि बँकांना शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याची विनंती केली.  जॉर्ज कुरियन यांनी शैक्षणिक केंद्र म्हणून पुण्याचे कौतुक केले आणि एएचआयडीएफ आणि एनएलएम च्या माध्यमातून  15,000 हून अधिक रोजगार  निर्मिती झाल्याचे अधोरेखित केले .

एस पी सिंह बघेल यांनी पारंपारिक पद्धतींपेक्षा अभिनव  पशुसंवर्धन तंत्र अवलंबण्याचे समर्थन केले आणि अचूक पशुगणना आणि उत्तम प्रजनन पद्धती यावर भर दिला.

कार्यक्रमाची सुरुवात अलका उपाध्याय, सचिव, भारत सरकार,यांच्या भाषणाने झाली, ज्यांनी पशुसंवर्धन हे अफाट गुंतवणूक क्षमता असलेले "उदयोन्मुख क्षेत्र" आहे असे नमूद केले. लम्पी रोगासाठी लस उत्पादना च्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी कौतुक केले आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक, प्रयोगशाळा मान्यता आणि उत्पादकता वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.

गो-सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आणि अनेक खासदार आणि परिषद सदस्यांसह अनेक खासदार  यावेळी उपस्थित होते. परिषदेत  "पशुधन क्षेत्रातील वाढीला उत्प्रेरित करणे : उद्योजकता, प्रक्रिया आणि संधी" आणि "पशुधन क्षेत्र आणि पतपुरवठा सुविधा यात बँका आणि एमएसएमईची भूमिका " अशी दोन तांत्रिक सत्रे होती, ज्यात तज्ञांनी गुंतवणूक आणि उद्योजकतेच्या संधींवर चर्चा केली.

अधिक तपशील मिळविण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.

NLM Success Stories https://drive.google.com/file/d/1x_ezHR9vGXvzeePH8uLcLL6n3FyF-83V/view?usp=sharing

 AHIDF Success Stories https://drive.google.com/file/d/1RHxqmOn5c4RpHe0DYpBbE8tnxNEaSXjR/view?usp=sharing

NLM Guidelines 2.0 https://drive.google.com/file/d/1iTEmyF6FCk5-YudwgZhjsIj9dOiZDDsJ/view?usp=sharing

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2092602) Visitor Counter : 75


Read this release in: English , Urdu , Hindi