विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय कलेची आभा प्रदर्शित करणाऱ्या ‘द आर्ट ऑफ इंडिया 2025’ प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केले उद्घाटन

Posted On: 11 JAN 2025 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);  पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या व्हिज्युअल आर्ट्स गॅलरी येथे भरलेल्या "आर्ट ऑफ इंडिया 2025" प्रदर्शनाचे उद्घाटन केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिकतेच्या सहजीवनाची मंत्र्यांनी प्रशंसा केली.

या लोकप्रिय आयोजनाच्या चौथ्या आवृत्तीत, भारतातील काही प्रतिष्ठित कलाकारांच्या तसेच काही उदयोन्मुख कलाकारांच्या आणि देशातील इतर कलाकारांच्या 250 पेक्षा जास्त उत्कृष्ट कलाकृती एकत्रित मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाने देशाच्या कलात्मक उत्क्रांतीचे ज्वलंत चित्रण उभे केले आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सर्वसमावेशकता आणि राष्ट्राभिमान जोपासण्यात कलेच्या भूमिकेवर भर दिला. “कला ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब नाही तर बदलाच्या काळात आशा आणि एकतेचे माध्यम आहे.  द आर्ट ऑफ इंडिया सारखी आयोजने सर्जनशीलतेच्या परिवर्तनीय शक्तीला अधोरेखित करतात तसेच भारतीय कलाकारांच्या प्रतिभेचा आणि विविधतेचा दाखला म्हणून काम करतात,” असे मत त्यांनी मांडले. भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचा प्रचार करण्यासाठी आयोजकांच्या निरंतर समर्पणाचे त्यांनी कौतुक केले.

"द आर्ट ऑफ इंडिया सारख्या उपक्रमांद्वारे, केवळ समकालीन समस्यांबद्दल लोकांना माहिती मिळत नाही तर आपल्याला प्राचीन, अंतर्निहित आणि शाश्वत गोष्टींशी आपण पुन्हा जोडले जातो", असे ते म्हणाले.  “बिग बुल” च्या आकर्षक कलाकृतीसह तिथे प्रदर्शित इतर कलाकृतींबाबत बोलताना त्यांनी, शाश्वत लोकाचाराच्या पायावर झालेली राष्ट्र उभारणी हे 21 व्या शतकातील भारताच्या उत्कर्षाचे प्रतीक आहे असे त्यांनी नमूद केले. “भविष्याला सामावून घेताना आपल्या मुळांचा सन्मान करणे, हे नाजूक संतुलन आपल्या राष्ट्राच्या प्रवासाला आकार देणाऱ्या मूल्यांचा दाखला आहे,” असेही ते म्हणाले.

असे उपक्रम भारताच्या प्रवासाला आकार देणाऱ्या कलात्मक आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करतात आणि ही मूल्ये भविष्यात आपल्या प्रवासाचा अविभाज्य घटक बनून राहतील हे सुनिश्चित  करतात, असे मत डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. "आपल्याला आपल्या मुळांशी जोडून आणि समकालीन अभिव्यक्तीला प्रोत्साहन देऊन हे प्रदर्शन केवळ आपल्या भूतकाळाचाच सन्मान करत नाही तर 2047 च्या कल्पनेनुसार विकसित भारताचा सांस्कृतिक पाया देखील रचते," असे ते म्हणाले.

डॉ. अलका पांडे यांनी क्युरेट केलेले, “द आर्ट ऑफ इंडिया 2025” प्रदर्शन कलात्मक शैली आणि कथनांचे इंद्रधनू अधोरेखित करते. हे प्रदर्शन राजा रविवर्मा, एम.एफ. हुसेन आणि एस.एच. रझा यांसारख्या दिग्गजांच्या कालातीत कामापासून ते समकालीन आणि देशातील कलाकारांच्या नाविन्यपूर्ण कलाकृतींपर्यंतचा देशाच्या कलात्मक वंशावळीचा एक आकर्षक प्रवास डोळ्यासमोर उभा करते.  भारतीय दिग्गज, समकालीन आणि लोककलाकारांच्या आशा, शांतता आणि सर्वसमावेशकतेचे सार असणाऱ्या कलाकृतींचा उत्सव  साजरा करणे, ही या वर्षीच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे.

2022 मध्ये आपल्या स्थापनेपासूनच, “द आर्ट ऑफ इंडिया” हा कार्यक्रम देशव्यापी कलाप्रेमी, संग्राहक आणि रसिकांसाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून सांस्कृतिक दिनदर्शिकेवर उदयास आला आहे.  या वर्षीच्या आवृत्तीत, 500 पेक्षा जास्त कलाकार आणि कलादालनांचे योगदान दर्शवण्यात आले असून हे प्रदर्शन भारताच्या कलात्मक विविधतेचा ऐतिहासिक उत्सव बनण्याचे वचन देते.

या प्रदर्शनाने परंपरा आणि आधुनिकता, अलंकारिक आणि अमूर्तता, ऐतिहासिक मुळे आणि समकालीन अभिव्यक्ती यांच्या छेदनबिंदूंचा ठाव घेत उपस्थितांना नेत्रसुख दिले. भारताच्या कलात्मक कथनाचे व्यापक कौतुक करून ते सर्व पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणे हे देखील या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे.

भारताची कला आणि संस्कृती जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या व्यासपीठांना प्रोत्साहन देत राहण्याच्या आवाहनाने कार्यक्रमाची सांगता झाली.  प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जितेंद्र सिंग यांच्या सहभागाने या सोहळ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे दिग्गज आणि उदयोन्मुख कलाकार दोघांनाही प्रेरणा मिळाली.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2092173) Visitor Counter : 11


Read this release in: English