गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे 'अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा' विषयक परिषद संपन्न
Posted On:
11 JAN 2025 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. या वेळी त्यांनी 'अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा' अभियानाचा शुभारंभ केला, भोपाल येथील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले; आणि 36 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये मानस-2 हेल्पलाइनचा विस्तार करण्याची घोषणा देखील केली.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर नियंत्रण आणणे आणि राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा होणारा परिणाम रोखणे हा या अभियानाचा उद्देश आहे. विशेषतः भारताच्या उत्तर भागातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या परिषदेचा लक्ष्यित केंद्रबिंदू असणार आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की प्रादेशिक परिषदा या देशाच्या अमली पदार्थांविरोधातील लढाई बळकट करण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहेत. पुढे त्यांनी नमूद केले की 2024 मध्ये एनसीबी आणि भारतातील पोलीस दलांनी स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी अमली पदार्थांची जप्ती केली असून, त्याची बाजारातील किंमत तब्बल 16,914 कोटी रुपये इतकी आहे. देशातील या संकटांविरुद्धच्या मोहिमेतील हे एक महत्त्वपूर्ण यश आहे. या लढाईत पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वेळोवेळी धोरणे आखणे, कार्यात तीव्रता वाढवणे, सूक्ष्म नियोजन करणे आणि सातत्याने देखरेख करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘अमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा’ अभियानाची घोषणा करताना शाह यांनी सांगितले की पुढील 10 दिवसांत सुमारे 8,600 कोटी रुपये किंमतीचे, एक लाख किलोग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात येतील. यामुळे सरकार अमली पदार्थांवरील नियंत्रणासाठी वचनबद्ध असल्याचा सकारात्मक संदेश जनतेत जाईल.
या वेळी शाह यांनी भोपाळ येथील एनसीबीच्या प्रादेशिक विभागाचे उद्घाटन केले आणि मानस-2 हेल्पलाइनचा विस्तार 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्याचे घोषित केले. त्यांनी सर्व राज्यांना 'मानस' ॲप आणि टोल-फ्री क्रमांकाचा प्रचार करण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की 25,000 पेक्षा जास्त लोकांनी या हेल्पलाइनचा उपयोग केला आहे. प्रत्येक कॉलवर त्वरित आणि परिणामकारक कृती केल्यास हेल्पलाइनची विश्वासार्हता वाढेल, असे त्यांनी सांगितले.
सामूहिक जबाबदारी आणि समर्पित प्रयत्नांमुळेच ‘अमली पदार्थमुक्त भारत’ हे ध्येय साध्य करता येईल, असे त्यांनी सरतेशेवटी नमूद केले.
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092152)
Visitor Counter : 28