माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रवासी भारतीय दिवस


Posted On: 08 JAN 2025 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025

 

देशाने पुढील 25 वर्षांच्या अमृत काळात प्रवेश केला आहे. या प्रवासात आपल्या अनिवासी  भारतीयांना महत्त्वाचे स्थान आहे. भारताचा अनोखा जागतिक दृष्टीकोन आणि जागतिक व्यवस्थेतील त्याची महत्त्वाची भूमिका तुमच्यामुळे बळकट होणार आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी 

 

परिचय

प्रवासी भारतीय दिवस  दोन वर्षातून एकदा 9 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो अनिवासी भारतीय समुदायाच्या त्यांच्या मातृभूमीप्रति योगदानाचा सन्मान करतो. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान दिवंगत  अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात, परदेशातील भारतीय समुदायाला ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची  प्रथम सुरुवात झाली होती.

प्रवासी भारतीय दिवस हा परराष्ट्र मंत्रालयाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. भारतातील विविध प्रदेशातील विविधता आणि प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी विविध शहरांमध्ये याचे आयोजन  केले जाते. 2015 पासून द्विवार्षिक कार्यक्रमात याचे रूपांतर झाले आणि या मधल्या काळात संकल्पना -आधारित परिषदांचे आयोजन करण्यात आले. या स्वरूपात स्वारस्याच्या विशिष्ट क्षेत्रांवर अधिक केंद्रित चर्चा करता येते आणि जागतिक भारतीय समुदायाला  यात सहभागी होण्याची संधी प्रदान करते.

18 वा प्रवासी भारतीय दिवस - 2025

18 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन 8-10 जानेवारी 2025 रोजी ओदिशातील भुवनेश्वर येथे होणार आहे. या वर्षाची संकल्पना “विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान” अशी आहे.

हा कार्यक्रम अनेक प्रमुख वैशिष्ट्यांसह महत्वपूर्ण ठरणार आहे :

दिवस 1:  08 जानेवारी 2025

  • युवा प्रवासी भारतीय दिवस:

दिवस 2:  09 जानेवारी 2025

  • 18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन
  • भारतीय समुदायासाठी  खास पर्यटक रेल्वेगाडी प्रवासी भारतीय एक्स्प्रेसच्या पहिल्या  प्रवासाला पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे  हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील . ही गाडी दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून निघेल आणि तीन आठवड्यांच्या  कालावधीत भारतातील अनेक पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांपर्यंत प्रवास करेल.  परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवासी तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत प्रवासी भारतीय एक्सप्रेस चालवली जाईल.
  • 18 व्या प्रवासी भारतीय संमेलनात  खालील चार प्रदर्शनांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत:
  1. विश्वरूप राम - रामायणाचा सार्वत्रिक वारसा:
  2. समुदायाचे तंत्रज्ञान आणि विकसित भारतातील योगदान. या प्रदर्शनात जगात तंत्रज्ञानाच्या विकासात भारतीय समुदायाने दिलेल्या  योगदानाची  दखल घेतली जाईल.
  3. गुजरात मधल्या मांडवी ते मस्कतवर विशेष भर देत  जगामध्ये भारतीय समुदायाचा प्रसार आणि उत्क्रांती.
  4. ओदिशाचा वारसा आणि संस्कृती: हे प्रदर्शन ओदिशाचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरा त्याच्या विविध कला आणि हस्तकला प्रकारांद्वारे प्रदर्शित करेल आणि त्याचा गौरवशाली वारसा अधोरेखित करेल.

दिवस 3: 10 जानेवारी 2025

  • समारोप  सत्र: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे समारोपाचे भाषण  आणि त्याचबरोबर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण

12 नोव्हेंबर 2024 रोजी अधिकृत संकेतस्थळाचे (pbdindia.gov.in) उद्घाटन झाल्यावर 2025 च्या संमेलनासाठी ऑनलाइन नोंदणीची सुरुवात झाली.

17 वे संमेलन – 2023

8-10 जानेवारी 2023 दरम्यान इंदूर, मध्य प्रदेश येथे आयोजित 17 व्या प्रवासी भारतीय संमेलनात  “भारतीय समुदाय : अमृत कालमध्ये भारताच्या प्रगतीसाठी विश्वसनीय भागीदार” या संकल्पनेवर लक्ष केंद्रित केले गेले. या कार्यक्रमात गयाना आणि सुरीनामच्या अध्यक्षांसह मान्यवर पाहुण्यांचा सहभाग दिसून आला , ज्याने भारतीय समुदायाचे  जागतिक महत्त्व अधोरेखित केले.

इंदूर, मध्य प्रदेश येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार

इंदूर, मध्य प्रदेश येथे 17 व्या प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2023 प्रसंगी  परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

इतिहास आणि महत्त्व

महात्मा गांधी हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी 9 जानेवारी 1915 मध्ये  दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले, त्या दिवसाची आठवण म्हणून या द्विवार्षिक समारंभाचे आयोजन केले.

 

उद्दिष्टे आणि परिणाम

प्रवासी भारतीय दिवसाच्या आयोजनाची प्राथमिक उद्दिष्टे:

  1. भारताच्या विकासातील परदेशस्थ भारतीय समुदायाच्या योगदानाचा गौरव
  2. इतर देशांना  भारताबद्दल अधिक जाणून घेता यावे
  3. जगभरातील स्थानिक भारतीय समुदायांच्या कल्याणाच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या भारताच्या कार्याला पाठिंबा 
  4. परदेशस्थ भारतीयांना त्यांच्या वाडवडीलांच्या भूमीत सरकार आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.  

परदेशात मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय समुदायांसोबतचे भारताचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ही अधिवेशने महत्त्वाचे साधन ठरली आहेत, त्यामुळे विविध क्षेत्रांतील अनुभव, ज्ञान आणि कौशल्ये यांची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे.

निष्कर्ष

प्रवासी भारतीय दिवस हा जगभरातील भारतीय समुदायाला मोलाचा ठेवा म्हणून भारताने त्यांना दिलेले मानाचे स्थान दर्शवितो. हा उपक्रम केवळ सामायिक वारशाचा गौरवच नव्हे तर विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या वाटचालीत परदेशातील भारतीयांच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठीचे धोरणात्मक व्यासपीठ देखील ठरत आहे. जागतिक स्तरावर भारत आपले स्थान बळकट करत असताना, जगभरातील आपल्या समुदायासोबत दृढ संबंध जोपासण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या प्रावीण्याचा राष्ट्रीय विकासात उपयोग करून घेण्यासाठी प्रवासी भारतीय दिवस नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

संदर्भ

Pravasi Bharatiya Divas 

 

* * *

N.Chitale/Sushma/Manjiri/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091315) Visitor Counter : 65