संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय युद्धनौका आयएनएस तुशिलचे, सेनेगल देशात डकार येथे आगमन

Posted On: 05 JAN 2025 1:46PM by PIB Mumbai

 

आय एन एस तुशील, ही भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट), 03 जानेवारी 25 रोजी सेनेगलच्या डकार बंदरात डेरेदाखल झाली. या भेटीमुळे सेनेगलसोबतचे विद्यमान संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्परसंवाद वाढेल.

कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस तुशील तिच्या बंदरातील मुक्कामा दरम्यान (पोर्ट कॉल) विविध लष्करी आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होईल. यामध्ये सेनेगलचे वरिष्ठ लष्करी आणि सरकारी अधिकारी यांच्याशी संवाद, तसेच अत्याधुनिक स्वदेशी बनावटीची शस्त्रे, संवेदक (सेन्सर्स) आणि जहाजावरील साधनसामुग्रीचे प्रदर्शन यांचा समावेश असेल. या युद्धनौकेवर, दोन्ही नौदलातील संबंधित तज्ञांमध्ये परस्परांना लाभदायक ठरणाऱ्या समस्या निवारणाच्या उपायांबाबत संवाद घडेल आणि प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणही पार पाडेल. सेनेगलच्या हौशी नागरिकांसाठी योगाभ्यासाचे एक उत्साहवर्धक सत्र देखील, इथे नियोजित आहे.  भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी, इथे  सामाजिक संवादाचे आयोजन देखील होणार आहे. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर, ही युद्धनौका संवाद आणि सहकार्य वाढवणाऱ्या संयुक्त सरावा (पॅसेज एक्सरसाइज -PASSEX) मध्ये भाग घेईल आणि पश्चिम आफ्रिकी  किनाऱ्यावळील समुद्रात सेनेगलच्या नौदलासह संयुक्त गस्त घालणारे संचलन करेल.  प्रादेशिक सुरक्षा वाढवून, आंतरपरिचालनाला चालना देत दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे.

भारताने सेनेगलसोबतच्या संबंधांना दिलेले महत्त्व आणि दोन्ही राष्ट्रांमधील वाढणारे संरक्षण सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नाचे हे आणखी एक प्रखर द्योतक आहे. यामुळे दोन्ही नौदलांना एकमेकांकडून शिकण्याची आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची संधी देखील मिळेल.

***

S.Pophale/A.Save/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2090317) Visitor Counter : 61


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil