नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
ओंकारेश्वर तरंगते सौर उद्यान हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांच्या प्रगतीचे प्रतीक – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
Posted On:
04 JAN 2025 6:04PM by PIB Mumbai
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर उद्यानाला भेट दिली. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'X' या समाजमाध्यमावर आपली भावना व्यक्त करताना लिहिले:
"खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर फ्लोटिंग सौर प्रकल्पाला भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर उद्यान प्रकल्पांपैकी एक आहे. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा भवितव्याला आकार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या दृढ पाठिंब्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा प्रकल्प भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांसाठी महत्त्वाचा आणि प्रगतीचे प्रतिक असलेला प्रकल्प आहे."
मंत्रीमहोदयांनी त्यांच्या भेटीदरम्यान या प्रकल्पातील तंत्रज्ञानाच्या नाविन्यतेवर भर दिला. त्यांनी सांगितले की हे तंत्रज्ञान जमिनीच्या मर्यादांवर मात करून शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणारे आहे. तसेच पाण्याच्या थंडाव्यामुळे सौर पॅनलच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले, ज्यामुळे ऊर्जा उत्पादन अधिक प्रभावी होते.
सध्या या प्रकल्पाची 278 मेगावॅटची क्षमता कार्यान्वित केली गेली आहे. या प्रकल्पाच्या विकासासाठी 330 कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे, ज्यामध्ये 49.85 कोटी रुपयांचे केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090225)
Visitor Counter : 38