कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत योजनांबाबत आढावा बैठक
Posted On:
04 JAN 2025 4:00PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या विविध योजनांसंदर्भात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत दूरस्थ पद्धतीने आढावा बैठक घेतली. नवीन वर्षात नवीन संकल्पांसह आपण कृषी विकास आणि कृषक कल्याणाचे काम वेगाने सुरू ठेवू, असे शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रालयाच्या विविध कामांचा आढावा घेताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.46 लाख कोटी रुपये 18 हप्त्यांमध्ये वितरित करण्यात आले आहेत, हे सांगताना आपल्याला आनंद होत असल्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. मोदीजींच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत 25 लाखापेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश झाला आहे. 18 वा हप्ता प्राप्त होणार असलेल्या लाभार्थींची संख्या 9.58 कोटी (9 कोटी 58 लाख) झाली आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की प्रधानमंत्री पीक विमा योजना ही जगातील सर्वात मोठी पीक विमा योजना आहे. यामध्ये 876 लाख कर्जदारांचे अर्ज प्राप्त झाले असून कर्जदार नसलेल्या अर्जदारांची संख्या 552 लाख आहे. एकंदर 14.28 कोटी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, 602 लाख हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला असून उतरविल्या गेलेल्या विम्याची एकूण रक्कम 2,73,049 कोटी रुपये एवढी आहे. चाळीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. योजना सुरू झाल्यापासून शेतकरी बांधवांना दाव्यापोटी 17 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खतांवर अनुदानाची तरतूद आहे. DAP सारख्या खतावर 50 किलोच्या प्रत्येक गोणीमागे आता 1350 रुपये या दराने अनुदान मिळणार असून त्यासाठी 3800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे चौहान यांनी सांगितले
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की कृषी कर्जांसाठी कमी व्याजदराच्या कर्जाची व्यवस्था करण्यासह अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी किमान आधारभूत किमतीची तरतूद आहे. सरकारकडे जेवढा गहू आणि तांदूळ येईल तो सर्व या दराने खरेदी करण्याची व्यवस्था केली जात आहे.
कृषी क्षेत्राची प्रगती होत असून त्यासाठी आपण सर्वजण सातत्याने प्रयत्न करत आहोत. आजच्या बैठकीचा दोन गोष्टींवर मुख्य भर आहे. राज्यांतील शेतीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावर बोलण्याचे आवाहन करतो. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात प्रस्ताव देणे हा आजच्या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. त्याअगोदर आम्ही शेतकरी आणि संबंधितांशीही चर्चा केली. कृषीमंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतात. अर्थसंकल्प आणि सध्या सुरू असलेल्या योजनांच्या संदर्भात काही सूचना किंवा सुधारणा आवश्यक असल्यास त्याबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे चौहान यांनी यावेळी सांगितले.
***
M.Pange/M.Ganoo/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090213)
Visitor Counter : 34