कोळसा मंत्रालय
2024 या कॅलेंडर वर्षात कोळसा उत्पादन आणि तो मागणीकर्त्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहचवण्याच्या बाबतीत कोळसा क्षेत्राने गाठला आजवरचा उच्चांक
Posted On:
04 JAN 2025 3:16PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने 2024 या कॅलेंडर वर्षात कोळसा उत्पादन आणि तो मागणीकर्त्यांना प्रत्यक्ष पोहचवण्याच्या (dispatch) बाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या माध्यमातून कोळसा मंत्रालयाने ऊर्जा सुरक्षा साध्य करण्याबद्दलच्या तसेच आत्मनिर्भर भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याबद्दलच्या स्वतःच्या वचनबद्धतेला नवा आयाम दिला आहे.
2024 या वर्षात देशाचे कोळसा उत्पादन 1,039.59 दशलक्ष टन (तात्पुरते) इतके उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. त्याआधीच्या वर्षात हेच प्रमाण 969.07 दशलक्ष टन इतके होते. त्या तुलनेत 2024 या वर्षात देशाच्या कोळसा उत्पादनात 7.28% इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. कोळसा उत्पादनात झालेल्या या वाढीमधून देशांतर्गत कोळशाची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि ऊर्जेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मंत्रालयाच्या वतीने केल्या जात असलेल्या धोरणात्मक प्रयत्नांचेच प्रतिबिंब उमटले आहे.
याच प्रकारे 2024 या वर्षात कोळशाच्या मागणीकर्त्यांपर्यंत तो प्रत्यक्ष पोहचवण्याच्या (coal dispatch) बाबतीतही कोळसा मंत्रालयाने देशभरातील कोळशाच्या मागणीकर्त्यांपर्यंत 1,012.72 मेट्रिक टन इतका (तरतूदीअंतर्गत) कोळशाचा साठा पोहोचवत नवा विक्रमी उच्चांक गाठला. 2023 या वर्षात कोळसा मंत्रालयाने कोळशाच्या मागणीकर्त्यांपर्यंत 950.39 दशलक्ष टन कोळसा पोहचवला होता, त्या तुलनेत 2024 या वर्षात 6.56% इतकी वाढ नोंदवली गेली. कोळशाचे उत्पादन आणि मागणीकर्त्यांपर्यंत तो प्रत्यक्ष पोहचवणे या दोन्हीमध्ये सातत्याने होत असलेल्या या वाढीतून वीजनिर्मिती आणि इतर उद्योगांसाठी कोळशाची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या बाबतीतील कोळसा उत्पादन क्षेत्राची वचनबद्धता अधोरेखित होत आहे, तसेच यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा देखील अधिक बळकट होत आहे.
कोळसा उत्पादनाचा पूरेपूर क्षमतेने वापर आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर कोळसा मंत्रालयाने भर दिला आहे. कोळसा मंत्रालयाचे हे धोरण कोळसा आयातीवरचे अवलंबित्व कमी करणे, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाला अधिक सक्षम करणे आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत स्वतःचे योगदान देण्याच्या उद्दिष्टांना अनुरुप असल्याचे कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे.
***
M.Pange/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090159)
Visitor Counter : 35