विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
इस्रोचे स्पाडेक्स मिशन : स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानातील प्रमुख देशांच्या पंक्तीत भारताला स्थान ही अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताची एक मोठी झेप”, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
31 DEC 2024 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असून या प्रयोगामुळे भारताला स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानात जागतिक प्रमुख देशांमध्ये बरोबरीचे स्थान मिळाले आहे. 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून PSLV-C60 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही मोहीम मैलाचा दगड असल्याचे सांगितले.
स्पेडेक्स मिशन हा इस्रोचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश दोन लहान उपग्रहांचा वापर करून ते जोडणे, डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचे प्रदर्शन करणे हा आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. उपग्रह सेवा, अंतराळ स्थानक ऑपरेशन्स आणि आंतरग्रहीय शोध या क्षमता भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण आहेत, असेही त्यांनी सांगितले.
7 जानेवारी 2025 रोजी दुपारी डॉकिंग होणे अपेक्षित असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. अंतराळात जीवशास्त्राच्या उपयोगाचा शोध घेण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग आणि इस्रो यांच्यातील महत्त्वपूर्ण सहकार्यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रकाश टाकला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत 'अंतराळ-जीवशास्त्र' क्षेत्रात नेतृत्व करेल," असे ते म्हणाले.
2023 मध्ये $ 8.4 अब्ज मूल्य असलेली अंतराळ अर्थव्यवस्था 2033 पर्यंत $ 44 अब्जापर्यंत वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या क्षेत्रातील गुंतवणूक केवळ 2023 मध्ये 1000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.
डॉ. सिंह यांनी महत्त्वाकांक्षी टाइमलाइनची रूपरेषा आखली : जानेवारी 2025 : NAVIC मोहीमेची प्रगती आणि फेब्रुवारी 2025 मध्ये : व्योममित्रा, एक महिला रोबोट, गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांसारखी कार्ये हाती घेईल.2026 : गगनयान मिशनचे पहिले क्रू .2035 : भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक, भारत अंतरिक्ष 2047 : भारताचा पहिला अंतराळवीर चंद्रावर उतरणार.
आदित्य L1 सौर मोहीम आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रहांचे प्रक्षेपण यांसारख्या 2024 मधील कामगिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
भारताचे अंतराळ क्षेत्र परकीय चलन कमावणारे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून कमावलेल्या €22 कोटींपैकी, €18.7 कोटी म्हणजे—एकूण 85%—गेल्या आठ वर्षांत कमावले आहेत. इस्रोच्या सेवांचा लाभ घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, फ्रान्स, जपान आणि इतर अनेक देश समाविष्ट आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी कृषी, संरक्षण, जलसंपत्ती व्यवस्थापन, स्मार्ट शहरे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये अंतराळ तंत्रज्ञानाच्या विविध उपयोगांवर भर दिला. हवामान अंदाजासाठी मिशन मौसम सारखे उपक्रम भारताच्या वाढत्या अंतराळ क्षमतांचा प्रभाव दाखवतात, असेही ते म्हणाले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089091)
Visitor Counter : 54