संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या एआयपी प्रणालीसाठी एअर इंडीपेंडंट प्रोपल्शन प्लगची निर्मिती आणि पारंपारिक भारतीय पाणबुड्यांची क्षमता वाढवण्यासाठी पाणबुड्यांसोबत याच्या एकात्मिकरणासाठी संरक्षण मंत्रालयाचा मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत 1,990 कोटी रुपयांचा करार


कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांची मारक क्षमता वाढविण्यासाठी जास्त वजनाच्या इलेक्ट्रॉनिक जल क्षेपणास्त्रांच्या एकात्मिकरणासाठी फ्रांस नेव्हल ग्रुपसमवेत 877 कोटी रुपयांचा करार

Posted On: 30 DEC 2024 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या एआयपी प्रणालीसाठी  एअर इंडीपेंडंट प्रोपल्शन प्लगची निर्मिती  आणि  भारतीय पाणबुड्यांमध्ये ते लावण्यासाठी तसेच  कलवरी श्रेणीच्या पाणबुड्यांवर जास्त वजनाच्या इलेक्ट्रॉनिक जल क्षेपणास्त्रांचे (Electronic Heavy Weight Torpedo - EHWT) एकात्मिकरण करून घेणे या उद्देशांच्या पूर्ततेसाठी संरक्षण मंत्रालयाने दोन करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांचे अंदाजे मूल्य 2,867 कोटी रुपये इतके आहे. नवी दिल्ली इथे आज दि. 30 डिसेंबर 2024 रोजी देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत या दोन्ही करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

एआयपी प्लगची उभारणी करण्याचे आणि त्याला पाणबुड्यांसोबत जोडण्याचे काम करण्यासाठीचा करार मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत केला गेला आहे. या कराराचे  मूल्य 1,990 कोटी रुपये इतके आहे. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे विकसित केल्या जात असलेल्या जास्त वजनाच्या इलेक्ट्रॉनिक जल क्षेपणास्त्रांचे एकात्मिकरण करण्यासाठीचा दुसरा करार फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपबरोबर केला गेला आहे. या कराराचे अंदाजे मूल्य हे सुमारे 877 कोटी रुपये इतके आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्वदेशी पद्धतीने एआयपी हे तंत्रज्ञान विकसित करत आहे.  एआयपी प्लगची निर्मिती आणि त्याचे एकात्मिकरण घडवून आणण्याच्या या प्रकल्पामुळे देशाच्या ताफ्यात असलेल्या पारंपारिक पाणबुड्यांची पाण्यात टिकून राहण्याची क्षमता वाढेल आणि त्याच बरोबरीने हा उपक्रम आत्मनिर्भर भारतच्या जडणघडणीतही स्वतःचे महत्त्वाचे योगदान देऊ शकणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे तीन लाख मनुष्य दिवस इतका रोजगारही निर्माण होणार आहे. दुसरीकडे जास्त वजनाच्या इलेक्ट्रॉनिक जल क्षेपणास्त्रांचे एकात्मिकरणाचा प्रकल्प हा भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि फ्रान्सच्या नौदल समूहाच्या वतीने संयुक्तपणे साकरला जाणार आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या कलवरी या वर्गवारीतील पाणबुड्यांची मारक क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

 

* * *

N.Chitale/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2088951) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil