आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
हिवताप आणि कर्करोगाविरुद्धच्या यशस्वी लढ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
29 DEC 2024 9:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या आजच्या 117 व्या भागात हिवताप आणि कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात देशाने मिळवलेल्या मोठ्या यशाची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, या दोन क्षेत्रांमधील यश आज जगाचे लक्ष वेधून घेत आहे.

पंतप्रधान म्हणाले, “मलेरिया (हिवताप) हा गेल्या चार हजार वर्षांपासून मानवतेसमोरचे मोठे आव्हान ठरला आहे. एक महिना ते पाच वर्षे वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे तिसऱ्या क्रमांकाचे मुख्य कारण म्हणजे मलेरिया. आज मला समाधानाने सांगता येत आहे की, देशवासीयांनी एकत्रितपणे या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला केला आहे.” त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या ( डब्ल्यूएचओ-WHO) अहवालाचा उल्लेख करत पुढे सांगितले की, “2015 ते 2023 दरम्यान भारतात मलेरियाच्या रुग्णसंख्येत व मृत्यूंच्या प्रमाणात 80 टक्क्यांची घट झाली आहे.”
हे यश मिळवण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून सर्वांनी दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले.
कर्करोग विरुद्धच्या लढ्याबाबत पंतप्रधानांनी प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेटच्या अभ्यासाचा उल्लेख केला. या नियतकालिकामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, भारतात कर्करोगावरील उपचार वेळेत सुरू होण्याच्या शक्यतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कर्करोगाच्या रुग्णांना 30 दिवसांच्या आत उपचार मिळवून देण्यात आयुष्मान भारत योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, “या योजनेमुळे 90 टक्के कर्करोग रुग्णांना वेळेवर उपचार सुरू करता आले आहेत. पूर्वी पैसे नसल्यामुळे गरीब रुग्ण कर्करोगाची चाचणी व उपचार टाळत असत. आता आयुष्मान भारत योजना त्यांच्यासाठी मोठा आधार ठरली आहे. त्यामुळे ते पुढे येऊन उपचार करून घेत आहेत.”
***
S.Kane/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2088785)
आगंतुक पटल : 87