नौवहन मंत्रालय
राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पासह लोथल सागरी वारश्याचे जागतिक केंद्र बनेल - सर्बानंद सोनोवाल
Posted On:
28 DEC 2024 5:40PM by PIB Mumbai
केंद्रिय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह शनिवारी लोथल, गुजरात येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) प्रकल्पाच्या प्रगतीचा संयुक्त आढावा घेतला.
सागरमाला कार्यक्रमाच्या अंतर्गत बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करत आहे. हा जागतिक दर्जाचा प्रकल्प प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा भारताचा सागरी वारसा प्रदर्शित करेल. या प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने “शिक्षण-मनोरंजन” म्हणजेच एज्युटेन्मेंट दृष्टिकोन अवलंबून जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याचा उद्देश आहे.
लोथल या इ.स.पूर्व 2400 वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतील प्राचीन वसाहतीला प्रगत गोदी, भरभराटीच्या व्यापार व प्रसिद्ध मणी उद्योगासाठी ऐतिहासिक महत्व आहे. येथे सापडलेल्या शिक्के, साधने आणि मातीच्या भांड्यांसारख्या अवशेषांमुळे त्याचा समृद्ध सांस्कृतिक आणि आर्थिक वारसा दिसून येतो, ज्यामुळे लोथलला हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
मंत्र्यांनी आयएनएस निशांक, लोथल जेट्टी वॉकवे आणि संग्रहालय विभागासारख्या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच, त्यांनी कामगारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली. सोनोवाल यांनी नागरी पायाभूत सुविधांमध्ये गाठलेल्या महत्त्वाच्या टप्प्यांबाबत समाधान व्यक्त केले व प्रकल्प वेळेत प्रगती करत असल्याचे नमूद केले.
स्थानिक सहभाग आणि राष्ट्रीय वारसा वृद्धिंगत करणे
या आढाव्यात स्थानिक समुदायांचा प्रकल्पात सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी बोलताना सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “आम्ही एनएमएचसी प्रकल्प वेळेत आणि उच्च दर्जामध्ये पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत."
प्रकल्पाचे सामाजिक-आर्थिक प्रभाव अधोरेखित करताना सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “हा प्रकल्प रोजगार निर्माण करेल, कौशल्य विकासाला प्रोत्साहन देईल आणि गुजरातच्या तरुणांना सक्षम करेल."
एनएमएचसी भारताच्या सागरी वारशाचा एक मुख्य आधारभूत घटक बनेल. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आर्थिक आणि शैक्षणिक विकासाशी जोडेल.
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली सरकार राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) प्रकल्प वेळेत आणि उच्च दर्जा राखत पूर्ण करण्यास वचनबद्ध आहे,” असे सर्बानंद सोनोवाल यांनी नमूद केले. “हा प्रकल्प पर्यटनाला चालना देईल, सागरी शिक्षणासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल आणि भारताच्या सागरी समुदाय व जागतिक सागरी उद्योगामध्ये अधिक सहकार्य साध्य करेल. 2047 पर्यंत आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या मोदीजींच्या दृष्टिकोनाची पूर्तता करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे,” असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2088635)
Visitor Counter : 33