संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सूर्यकिरण या भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक रवाना

Posted On: 28 DEC 2024 8:41AM by PIB Mumbai

 

भारतीय लष्कराचे 334 जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. 

भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व 11 गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नोपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग बटालियनकडे आहे.

जंगलातील युद्धकौशल्य, पर्वतीय प्रदेशातील दहशातवादविरोधी कारवाया आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार आपत्ती काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केली जाणारी मदत यामध्ये संयुक्त कार्यक्षमता बळकट करणे हे सूर्यकिरण सराव आयोजनाचे उद्दीष्ट आहे. या सरावात कार्यसज्जता वाढविणे, वैमानिक प्रशिक्षण पैलू, वैद्यकीय प्रशिक्षण आणि पर्यावरण रक्षण यावर भर दिला जाईल. या प्रशिक्षणाद्वारे दोन्ही देशांची लष्करी पथके आपली प्रत्यक्ष कार्यक्षमता वाढवतील, युद्धकौशल्यांमध्ये आणखी सुधारणा करतील आणि आव्हानात्मक परिस्थितीत एकत्र काम करण्यासाठी परस्पर सहकार्य मजबूत करतील.   

या वेळी भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या यशस्वी नेपाळ भेटीनंतर आणि नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्डेल यांच्या भारत दौऱ्यानंतर सूर्यकिरण सराव आयोजित करण्यात आला आहे. या सरावामुळे भारत आणि नेपाळच्या जवानांना एकमेकांच्या कल्पना व अनुभव परस्परांना सांगता येतील, एकमेकांच्या चांगल्या गोष्टी शिकता येतील आणि एकमेकांची कार्यपद्धती चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

सूर्यकिरण सरावाच्या आयोजनातून दोन्ही देशांमधील मैत्रीचे दृढ बंध, विश्वास तसेच भारत आणि नेपाळमधील समान सांस्कृतिक धागे दिसून येतात. या सरावामुळे दोन्ही देशांना सफल व व्यावसायिक देवाणघेवाणीसाठी एक मंच उपलब्ध होतो ज्याद्वारे दोन्ही देशांची संरक्षण क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतची अतूट वचनबद्धता प्रतीत होते. या संयुक्त लष्करी सरावामुळे समान संरक्षण उद्दीष्टे साध्य होतील आणि दोन्ही शेजारी देशांमधले द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यात मदत मिळेल.  

***

JPS/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2088544) Visitor Counter : 129