वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
स्टार्टअप्सना साहाय्य करण्यासाठी डीपीआयआयटीने 'बोट' या खासगी कंपनीसोबत केला सामंजस्य करार
Posted On:
27 DEC 2024 7:37PM by PIB Mumbai
डीपीआयआयटी अर्थात उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने ऑडिओ आणि वेअरेबल मार्केट्समधील बोट या भारतीय कंपनीसोबत धोरणात्मक सहयोग केला आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट नवोन्मेषाला चालना देणे आणि D2C आणि निर्मिती क्षेत्रातील स्टार्टअप्ससह डीपीआयआयटी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सना अनुरूप पाठबळ प्रदान करणे आहे.
आपापसातील या भागीदारीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे: स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित कार्यक्रम/उपक्रम आखणे, प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसारखे विविध टप्पे गाठण्यासाठी संसाधने, मार्गदर्शन आणि पाठबळ प्रदान करणे आणि जिथे लागू व व्यवहार्य आहे अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी दुवे आणि अंतर्दृष्टी प्रदान करणे.
याप्रसंगी बोलताना, स्टार्टअप इंडियाचे सहसचिव संजीव म्हणाले, “आपल्या स्टार्टअप्सना सर्वोत्तम कौशल्य आणि भरपूर संसाधनांनी सुसज्ज करण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरेल आणि जागतिक दर्जाचे निर्मिती आणि उद्योजकता केंद्र बनण्याच्या भारताच्या निर्धारात योगदान दिले जाईल. बोटसारख्या उद्योग अग्रणींशी स्टार्टअप्सना जोडून, आम्ही नवोन्मेषाला चालना देणे, उत्पादन विकास वाढवणे आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ब्रँडस प्रस्थापित करण्यासाठी पाठबळ देणे हे आमचे ध्येय आहे.”
या भागीदारीचे कौतुक करताना बोटचे सहसंस्थापक अमन गुप्ता म्हणाले, ''डीपीआयआयटीसोबत ही भागीदारी 'मेक इन इंडिया' उपक्रमातील आमची बांधिलकी दर्शवते. सरकारसोबत सहयोग करून, आम्ही उत्पादन स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि उद्योजकांसाठी एका संपन्न परिसंस्थेच्या विकासासाठी सज्ज आहोत."
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2088505)
Visitor Counter : 29