श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ऑक्टोबर 2024 मध्ये 13.41 लाख सदस्यांची निव्वळ वाढ
7.50 लाख नवीन सदस्यांची झाली नोंदणी
ऑक्टोबर 2024 मध्ये 18 ते 25 वयोगटातील 58.49% नवीन सदस्यांची पडली भर
Posted On:
25 DEC 2024 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ऑक्टोबर 2024 साठी वेतनपटाबाबत (पेरोल) तात्पुरती माहिती (डेटा) जारी केली आहे. यातून, 13.41 लाख सदस्यांची निव्वळ भर पडली असल्याचे दिसून येत आहे. ही वाढ, EPFO ने राबवलेल्या सहाय्यकारक प्रभावी संपर्क उपक्रमांमुळे, वाढलेल्या रोजगाराच्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वाढीव लाभांची निदर्शक आहे.
EPFO च्या ऑक्टोबर 2024 मधील वेतनपट विदेची (पेरोल डेटा) प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
नवीन सदस्यत्व:
EPFO ने ऑक्टोबर 2024 मध्ये सुमारे 7.50 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली. सदस्य संख्येत नवीन भर पडण्याचे श्रेय, वाढत्या रोजगाराच्या संधी, कर्मचाऱ्यांच्या फायद्यांबद्दल वाढलेली जागरूकता आणि EPFO च्या यशस्वी संपर्क कार्यक्रमांना दिले जाऊ शकते.
18 ते 25 चा वयोगट नवीन सदस्यत्वाच्या बाबतीत आघाडीवर आहे:
या माहितीचा एक लक्षणीय पैलू म्हणजे नवीन सदस्य संख्येत असलेले 18-25 वयोगटाचे वर्चस्व आहे. कारण ऑक्टोबर 2024 मध्ये भर पडलेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातले लक्षणीय असे 58.49% सदस्य आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये निव्वळ 18-25 वयोगटातील 5.43 लाख जण वेतनपटावर आहेत. हे पूर्वीच्या कलाशी सुसंगत आहे आणि त्यातून हेच सूचित होते की संघटित कर्मचारी बळामध्ये सामील होणारे बहुतेक लोक तरुण आहेत, प्रामुख्याने प्रथमच नोकरी करणारे आहेत.
पुन्हा सामील झालेले सदस्य:
अंदाजे 12.90 लाख सदस्य संघटनेतून बाहेर पडले आणि नंतर EPFOमध्ये पुन्हा सामील झाले, हे वैशिष्ट्य ठळकपणे या वेतनपट माहितीसंग्रहात दिसून येते. ही आकडेवारी ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 16.23% ची वाढ दर्शवते. या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या आणि EPFO च्या कक्षेत समाविष्ट असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा सामील झाले आणि अंतिम हिशोबासाठी अर्ज करण्याऐवजी त्यांची जमा रक्कम हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला. याद्वारे त्यांनी दीर्घकालीन आर्थिक कल्याण आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेचे संरक्षण, यांचा विचार केला.
महिला सदस्यत्वात वाढ:
या महिन्यादरम्यान भर पडलेल्या नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.09 लाख नवीन महिला सदस्य आहेत, असे वेतनपट माहितीच्या लिंगनिहाय विश्लेषणात आढळून येते. हा आकडा ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 2.12% ची वार्षिक वाढ दर्शवितो. तसेच या महिन्यात निव्वळ महिला सदस्यांची वाढ सुमारे 2.79 लाख होती. महिला सदस्यांच्या संख्येत झालेली वाढ, कार्यबळ अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण होत असल्याकडे निर्देश करते.
राज्यनिहाय योगदान:
वेतनपट माहितीचे राज्यवार विश्लेषण असे दर्शवते की पहिल्या पाच राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये निव्वळ सभासद वाढ ही निव्वळ सदस्यसंख्येच्या सुमारे 61.32% आहे. ही वाढ महिन्याभरात एकूण सुमारे 8.22 लाख निव्वळ सदस्यांची आहे. सर्व राज्यांमध्ये, महाराष्ट्र महिनाभरात 22.18% निव्वळ सदस्य वाढीसह आघाडीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा, तेलंगण आणि गुजरात या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी महिन्याभरात एकूण निव्वळ सदस्यांपैकी 5% पेक्षा जास्त सदस्य वाढ नोंदवली आहे.
उद्योगनिहाय कल:
उद्योग-निहाय माहितीची महिना-दर-महिना तुलना, रस्ते मोटार वाहतूक, खाजगी क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक माध्यम कंपन्या, राष्ट्रीयीकृत नसलेल्या इतर बँका अशा उद्योगांमधील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते. एकूण निव्वळ सभासदांपैकी सुमारे 42.29% वाढ तज्ञ सेवांमध्ये (मनुष्यबळ पुरवठादार, सामान्य कंत्राटदार, सुरक्षा सेवा, विविध उपक्रम इ.) आहे.
उपरोक्त वेतनपट माहिती तात्पुरती आहे, कारण कर्मचाऱ्यांची नोंद अद्ययावत करणे ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया असल्यामुळे, माहिती मिळणे ही देखील एक निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. मागील माहिती, पुढील दर महिन्याला अद्ययावत होत राहते. एप्रिल 2018 पासून, EPFO, सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीचा समावेश असलेली वेतनपट माहिती जारी करत आहे. मासिक वेतनपटामध्ये, आधार प्रमाणित युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे प्रथमच EPFO मध्ये सामील झालेल्या सदस्यांची संख्या, EPFO च्या कव्हरेजमधून बाहेर पडलेले विद्यमान सदस्य आणि सदस्य म्हणून बाहेर पडलेल्या परंतु पुन्हा सदस्य म्हणून सामील झालेल्यांची संख्या, निव्वळ मासिक वेतनट तयार करण्यासाठी विचारात घेतली जाते.
* * *
M.Pange/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087927)
Visitor Counter : 25