गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मुख्यालयाला दिली भेट
Posted On:
25 DEC 2024 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मुख्यालयाला भेट दिली. गृहमंत्र्यांनी सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कारवाई करण्याच्या तसेच प्रशासकीय कार्यक्षमतेचा सविस्तर आढावा घेतला. केंद्रीय गृहसचिवांसह गृह मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सीआरपीएफचे महासंचालक अनीश दयाल सिंग यांनी गृहमंत्र्यांना दलाच्या शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली, ज्यामध्ये सीआरपीएफ मधील अनुकंपा तत्त्वावरच्या नियुक्त्यांचाही समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सीआरपीएफ देशातील अंतर्गत सुरक्षा आणि शांतता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. शाह म्हणाले की नक्षलवादाचा सामना करण्यात आणि ईशान्येकडील राज्ये तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यात सीआरपीएफ ने उल्लेखनीय कार्य केले आहे.
अमित शाह यांनी दलाच्या दैनंदिन कामकाजात हिंदीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगितले, जे भाषिक एकतेसाठी उपयुक्त ठरेल. तसेच सैनिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी अधिकाधिक 'श्रीअन्न' (भरड धान्ये) चा वापर करण्यावर भर देऊन, गृहमंत्र्यांनी सैनिकांना आयुर्वेदाचे लाभ घेण्याचे आणि 'प्रकृती परीक्षण अभियाना'मध्ये सहभागी होऊन प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आरोग्यविषयक माहिती मिळवण्याचे आवाहन केले, ज्यामुळे आरोग्य सुधारेल आणि चांगले स्वास्थ्य राखता येईल.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीने राष्ट्रीय सुरक्षेसाठी सीआरपीएफ’च्या वचनबद्धतेची आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या बहुमूल्य योगदानाची सरकारने घेतलेली दखल अधोरेखित झाली.
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087849)
Visitor Counter : 71