आयुष मंत्रालय
राष्ट्रीय आयुष मिशनवर आयुष मंत्रालयाने फिल्म मालिका केली सुरू : परिवर्तनीय प्रभाव केला अधोरेखित
आयुष मिशन बाबतची माहिती लोकांपर्यंत सहज पोहचावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे : प्रतापराव जाधव,केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),आयुष मंत्रालय
Posted On:
24 DEC 2024 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024
आयुष मंत्रालयाने आज “सर्वांसाठी आयुष: राष्ट्रीय आयुष मिशनद्वारे सर्वांगीण आरोग्य सेवा” या शीर्षकाची एक फिल्म मालिका सुरू केली. या मालिकेत राष्ट्रीय आयुष मिशन (NAM) ची उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तनात्मक प्रभाव प्रदर्शित केला आहे. या मालिकेचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय तसेच केंद्रीय राज्यमंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.देशाच्या दुर्गम भागातील नागरिकांसह प्रत्येक नागरिकाला न्याय्य, परवडणारी आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा पोहोचवण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने या मालिकेची सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आयुष मिशन (NAM), ही एक केंद्र पुरस्कृत योजना असून आयुष आरोग्य सेवा बळकट करणे,आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) द्वारे प्रतिबंधात्मक काळजीला प्रोत्साहन देणे आणि आयुष प्रणालींना सार्वजनिक आरोग्याच्या मुख्य प्रवाहात समाकलित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
“राष्ट्रीय आयुष मिशनने समुदायांना पारंपारिक पद्धतींवर आधारित सुलभ आणि किफायतशीर आरोग्यसेवा मिळवण्यासाठी सक्षम बनवले आहे, असे आयुष राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीय आयुष मिशनच्या यशावर प्रकाश टाकताना सांगितले. ही मालिका आमच्या मंत्रालयाच्या उपक्रमांची माहिती लोकांना सहज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक पाऊल असून ही माहिती रोगाचा भार कमी करण्यात आणि संपूर्ण देशात निरोगीपणाला चालना देण्यात आयुषची महत्त्वपूर्ण भूमिका विशद करते.”
ही मालिका परिवर्तनाच्या वास्तविक जीवनातील कथांवर प्रकाश टाकते. याशिवाय, राष्ट्रीय आयुष मिशनने राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सहकार्याने आरोग्यसेवा कशी सुधारली आहे तसेच ग्रामीण आणि सेवा उपलब्ध नसलेल्या लोकांचा आरोग्य सेवांसाठी येणारा खर्च कसा कमी केला आहे, हे दर्शवते.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087751)
Visitor Counter : 29