कृषी मंत्रालय
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सहभाग
‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस’(+) अंतर्गत महाराष्ट्रासाठी 13 लाख 29 हजार 678 घरकुलांना मंजुरी : शिवराज सिंह चौहान
महाराष्ट्रात 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 19 लाख 66 हजार 767 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी 29, 501 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित : केंद्रीय कृषिमंत्री
ज्यांच्याकडे दुचाकी आणि दूरध्वनी आहे त्यांनाही आता ‘आवास प्लस’ योजनेंतर्गत पक्क्या घराचा लाभ : शिवराज सिंह चौहान
Posted On:
23 DEC 2024 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी आज राष्ट्रीय शेतकरी दिन 2024 निमित्त पुणे येथील कृषी संशोधन परिषद - कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेमध्ये आयोजित किसान सन्मान दिन आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतला. आपल्या भाषणात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस’ अंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रासाठी 13 लाख 29 हजार 678 घरे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे आणि आता अंतिम यादी केली जात आहे, ही अतिरिक्त घरे महाराष्ट्रात दिली जातील. एकही व्यक्ती पक्क्या घरापासून वंचित राहू नये, अशी सरकारची बांधिलकी असून त्यानुसार सरकार काम करत आहे. महाराष्ट्रात 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 19 लाख 66 हजार 767 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी एकूण 29501 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नव्याने स्थापन झालेले राज्य सरकार हे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली . यावेळी शिवराज सिंह चौहान म्हणाले की, सर्वाधिक घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत सामील होण्याची संधी मिळाली नाही किंवा ज्यांचे नाव या योजनेतील सर्वेक्षण यादीमध्ये नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, पूर्वी ज्यांच्याकडे दुचाकी आणि दूरध्वनी होते ते या योजनेपासून वंचित होते, मात्र आता ‘ आवास प्लस’ योजनेअंतर्गत अशा सर्व लोकांना घराचा लाभ मिळणार आहे. नवीन सर्वेक्षणानुसार आता 15 हजार मासिक उत्पन्न गटातील आणि 5 एकरपेक्षा जास्त असिंचित जमीन असलेल्या लोकांनाही या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
त्यांनी सांगितले की त्यांचे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप संवेदनशील आहे.देशभरात 3 कोटी "लखपती दीदी" घडविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शेतीमध्ये कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर थांबवण्याचे आवाहन करतानाच नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे आणि आपल्याला हे पूर्ण क्षमतेने पुढे न्यायचे आहे असे त्यांनी सांगितले.
कृषी मंत्र्यांनी असेही सांगितले की, आपल्याला अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे जे कमी पाण्याने अधिक सिंचन करू शकेल.
कृषी व शेतकरी कल्याण विभागाने राष्ट्रीय शेतकरी दिन 2024 निमित्त पुण्यातील आयसीएआर-अटारी येथे किसान सन्मान दिवस आणि शेतकरी व ग्रामीण विकास लाभार्थी परिषद आयोजित केली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री आणि कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
N.Chitale/S.Bedekar/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087400)
Visitor Counter : 38